विज्ञान रंजन कथा स्पर्धा

 

वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञानरंजन कथा स्पर्धा

विज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हा भाषा-साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पाश्चिमात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच. जी. वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर, श्री. लक्ष्मण लोंढे, डॉ. बाळ फोंडके आदी लेखकांनी उत्कृष्ट साहित्य निर्माण केलेले आहे. तरीही, मराठी भाषेत विज्ञानरंजन साहित्य कमीच आहे. या कार्याला चालना देण्यासाठी मराठी विज्ञान परिषद १९७०पासून विज्ञानरंजन कथा स्पर्धेचे सातत्याने आयोजन करीत आहे. यावर्षीदेखिल विज्ञानरंजन कथा स्पर्धेची घोषणा झाली आहे.

स्पर्धेसाठी पाठवलेल्या कथेला विज्ञानाची बैठक हवी आणि भाषेचे लालित्यही हवे. केवळ कथा नको किंवा केवळ विज्ञान नको, तर या दोन्हींचा संयोग हवा. तसेच, विज्ञानरंजन कथेतील विज्ञान हे ज्ञात सिद्धान्तांवरचे हवे. ज्ञात विज्ञानाच्या पुढे जाऊन कल्पनाविलासातून भविष्यकालीन संभाव्य विज्ञानाचा मागोवा घेणारे सिद्धान्त असले तरी चालतील. कथा ओघवती असावी, तसेच वातावरणनिर्मिती चित्तवेधक आणि वाचकांची उत्कंठा वाढविणारी असावी. कथा कंटाळवाणी होत नाही ना, याचा प्रत्यय कथालेखकाने स्वतःच घ्यावा. कथालेखकांनी विज्ञानाचे एखादे प्रमेय, सूत्र, संकल्पना घेऊन त्यावर आधारित कथा लिहावयाचा प्रयत्न करावा. कथेचे तपशील, लेखन आणि कथाबीज फुलवणे, तसेच संपूर्ण कथेचा परिणाम याकडे कथालेखकाने लक्ष द्यावे. सुमारे ३००० शब्दमर्यादेतील विज्ञानरंजन कथा पाठवण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ आहे. गुणानुक्रमे पहिल्या दोन विज्ञानरंजन कथांसाठी अनुक्रमे रु. २,५००/- आणि रु. २,०००/- अशी पारितोषिके दिली जातील. पारितोषिकप्राप्त कथा मराठी विज्ञान परिषद ‘पत्रिका’ ह्या मासिकात प्रकाशित करण्यात येतात.

 स्पर्धेचे नियम (वर्ष २०२२साठी) :

 1. विज्ञानरंजन कथा स्वतःची असल्याचे प्रतिज्ञापत्र प्रत्येक लेखकाने कथेबरोबर देणे अनिवार्य आहे. प्रतिज्ञापत्र नमुना   Download
 2. स्पर्धेत कोणालाही भाग घेता येईल, मात्र ज्या व्यक्तींस यास्पर्धेत आजवर दोनदा पारितोषिक मिळाले आहे, अशांनी आपली कथा पाठवली तरी चालेल, तथापि त्या कथेचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.
 3. कथेसाठी कमाल शब्दमर्यादा सुमारे ३००० आणि किमान १००० इतकी आहे. लिखाण कागदाच्या एकाच बाजूला असावे. कथा संगणक टंकलिखित असल्यास उत्तम, कागद ए-४ आकाराचा असावा.
 4. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन पूर्व नोंदणी करावी.
 5. पूर्वनोंदणी करण्यासाठीचा अर्ज www.mavipa.org या संकेत-स्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये स्पर्धकाने योग्य प्राथमिक माहिती सादर करावी.
  पूर्व नोंदणी अर्ज
 6. हाती लिहिलेल्या कथेच्या प्रत्येक पानाचा फोटो अथवा स्कॅनिंग सुस्पष्ट आणि वाचनिय असेल ही काळजी स्पर्धकाने घ्यावी. कोणतेही लिखाण कापले जाणार नाही, उलटसुलट, आडवे-तिडवे, खूप लांबून फोटो अशा बाबी टाळाव्यात. लिखाण नीट वाचता येईल आणि फोटोमध्ये सावली येणार नाही, असेच फोटो घ्यावेत.
 7. कथा JPG / PDF स्वरुपात office@mavipa.org या ई-मेलवर पाठवावी.
 8. स्पर्धकाने पहिल्या पानावर आपले पूर्ण नाव, पिनकोडसह पोस्टाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल लिहावा. कथा पीडीएफ स्वरुपात पाठविल्यास पहिल्या पानाची पीडीएफ स्वतंत्र असावी. याचाच अर्थ, कथेची पीडीएफ आणि पहिल्या पानाची पीडीएफ वेगवेगळी असावी.
 9. कथेचे लिखाण सुटसुटीत व ठळक असावे अथवा ते संगणकीय टंकलिखित केलेले असावे, पृष्ठ क्रमांक सुस्पष्ट असावा. कथेमध्ये कुठेही स्पर्धकाचे नाव आढळल्यास कथा स्पर्धेतून बाद केली जाईल.
 10. स्पर्धेसंबंधी मराठी विज्ञान परिषदेचा निर्णय अंतिम राहील.
 11. कथा पाठविण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर, २०२२

विज्ञान रंजन कथा स्पर्धा (२०२२)  माहितीपत्रक  Download

गतवर्षातील विजेत्यांची नावे

गतवर्षातील विजेत्यांची नावे