व्ही. डी. चौगुले आणि मो. मु. मोहिले पारितोषिक

प्रवेश अर्ज (२०२२)

व्ही. डी. चौगुले आणि मो. मु. मोहिले पारितोषिक योजना

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर तीन वर्षांनी ‘राज्यपातळीवर बाल विज्ञान संमेलन’ भरविण्यात येते. पहिले बाल विज्ञान संमेलन डिसेंबर, १९९५मध्ये मुंबईत संपन्न झाले. पहिल्या संमेलनास मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन मुंबईतील व्ही. डी. चौगुले फाउण्डेशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन या ट्रस्टतर्फे आणि नंतर कै. मोरेश्वर मुकुंदराव मोहिले ह्यांच्या स्मरणार्थ – विद्यार्थ्यांसाठी असलेल्या – ह्या योजनेस अर्थसाहाय्य मिळाले. या वर्षी हे दहावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत सहकार विद्या प्रसारक मंडळ संचालित मराठी आणि इंग्रजी माध्यम, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, कळवा, ठाणे ४००६०५ येथे संपन्न होणार आहे. ज्या विद्यार्थांच्या प्रकल्पाची निवड झाली आहे असे, शालेय गट- ८वी ते १०वीमधील आणि कनिष्ठ महाविद्यालयीन गट- ११वी, १२वीमधील विद्यार्थी या संमेलनामध्ये त्यांचे प्रकल्प सादर करतील.

शालेय गटातील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून पारितोषकासाठी तीन उत्तम प्रकल्पांची निवड करण्यात येईल. यातील गुणानुक्रमानुसार पहिल्या तीन विद्यार्थ्यांना व्ही. डी. चौगुले परितोषिक देण्यात येतील (योजना १९९८पासून).

प्रथम क्रमांक –  ₹ ४०००/-  आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – ₹ ३०००/- आणि  प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – ₹ २०००/- आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ – १० विद्यार्थ्यांची निवड  पारितोषिक प्रत्येकी ५००/-

तसेच, कनिष्ठ महाविद्यालय गटातील गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना कै. मोरेश्वर मुकुंदराव मोहिले पारितोषिक देण्यात येईल (योजना २०१६पासून).

प्रथम क्रमांक –  ₹ ५०००/-  आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – ₹ ३०००/- आणि  प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – ₹ २०००/- आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ – १० विद्यार्थ्यांची निवड  पारितोषिक प्रत्येकी ५००/-

पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शकशिक्षकांनादेखील प्रोत्साहन म्हणून पारितोषिके दिली जातात. शिक्षकांना देण्यात येणारी रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या रकमेच्या १० टक्के अ‍सते.

विद्यार्थ्यांनी त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करावा, त्यावर विचार करावा, ते समजून घ्यावेत, त्यांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करून निष्कर्षाप्रत यावे आणि त्यावर अभ्यासप्रकल्प सादर कारावा. वरील गटानुसार, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेले अभ्यासप्रकल्प, https://mavipa.org/science/activity/reward/vdchrewd/ येथे, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पूर्वनोंदणी करून, मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांमध्ये तयार केलेला अंतिम प्रकल्प-अहवाल दि. ३० सप्टेंबर २०२२पर्यंत गुगल आवेदनाद्वारे मराठी विज्ञान परिषदेकडे सादर करायचे आहेत.

या दोन्ही पारितोषिकांच्या अटी आणि नियम पुढीलप्रमाणे –
१.    शालेय गट – इयत्ता ८वी  ते १०वी  विद्यार्थी,  कनिष्ठ महाविद्यालय गट – ११वी आणि १२वीचे  विद्यार्थी
२.    प्रकल्पासाठीचे विषय – १) दैनदिन जीवनातील भौतिकशास्त्र, २) दैनदिन जीवनातील रसायनशास्त्र, ३) दैनदिन जीवनातील जीवशास्त्र, ४) दैनदिन जीवनातील गणित. उदाहरणादाखल विषयसूची शेवटी पाहावी.
३.    प्रकल्पामध्ये वरील विषयाला अनुसरून तुम्ही निवडलेल्या विषयावर आधारीत एखादा प्रयोग, खेळणे, उपकरण असावे.
४.    प्रकल्पासाठी निवडलेल्या विषयावर यापूर्वी झालेल्या कामाबद्द्ल थोडक्यात माहिती.
५.    प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरलेले संदर्भ – वाचन, मार्गदर्शन, प्रत्यक्ष काम, अनुभव, प्रसारमाध्यमे, इंटरनेट आदी संदर्भांचा वापर करून केलेले प्रत्यक्ष काम – प्रयोग/ कृती, सर्वेक्षण इत्यादी आवश्यक.
६.    पारितोषिकाची सविस्तर माहिती https://mavipa.org/science/activity/reward/vdchrewd/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतपृष्ठावर जाऊन विद्यार्थांनी त्यांची पूर्वनोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी. पूर्वनोंदणी केल्यावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक, सुचना आणि प्रकल्प पाठवण्यासाठी गुगल फॉर्म लिंक इत्यादी माहिती तुमच्या ई-मेलवर पाठवली जाईल.
७.    प्रकल्प अहवालाचे स्वरूप :

अ.   ए-४ आकाराची पाने, प्रकल्प अहवाल हाती लिहिलेला अथवा टाईप केलेले लिखाण असावे.
ब.   प्रकल्पअहवाल हाती लिहिलेला असल्यास त्याच्या प्रत्येक पानाचा फोटो अथवा स्कॅनिंग सुस्पष्ट आणि वाचनीय असेल, ही काळजी स्पर्धकाने घ्यावी. प्रकल्पाचा हाती लिहिलेला अहवाल अथवा टाईप केलेला अहवाल पी.डी.एफ. स्वरूपातच असावा.
क.   प्रकल्पअहवालामध्ये गरजेनुसार कामाचा तपशील, निरीक्षण तक्ते, आकृत्या, छायाचित्रे, आलेख, प्रश्नावली, प्रारूप, निष्कर्ष अपेक्षित आहेत.
ड.   पूर्वनोंदणीनंतर तुम्हाला ई-मेलद्वारे पाठविण्यात येणारा नोंदणी क्रमांक हेच तुमच्या पीडीएफ फाईलचे नाव असावे. (उदा. नोंदणी क्रमांक “101” असेल तर पीडीएफ फाईलचे नाव ‘101.pdf’ असावे.)

८.    प्रकल्पअहवाल सादरीकरणाच्या सारांशाची ५ ते ७ मिनिटांची MP4 चित्रफित तयार करणे अपेक्षित आहे. तयार केलेली चित्रफीत तुमच्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची शेअर लिंक गुगल फॉर्ममध्ये टाकावी.
९.    प्रकल्पअहवाल त्याच विद्यार्थ्याने केला असल्याचे शाळा-मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र – पीडीएफ स्वरूपात.
१०. एका प्रकल्पासाठी कमाल दोन विद्यार्थ्यांनी काम केले तर चालेल. त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास प्रकल्प पारितोषिकासाठी स्विकारला जाणार नाही.
११. नमुना प्रकल्प संकेतस्थळावरील पृष्ठावर उपलब्ध आहे.
१२.  विषयाची निवड करताना स्थानिक प्रश्नांना प्राधान्य द्यावे. सर्वेक्षण पद्धतीमध्ये नमुना घटक ५० तरी असावा. सर्वेक्षण कालावधी (स्थळ, दिनांक आणि वेळ) नोंदवावा. तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन निवडलेल्या विषयाबाबत अधिक माहिती मिळवल्यास उत्तम.
१३. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची अंतिम सादरीकरणास्तव निवड होईल त्यांस संमेलनात सहभागी होता येईल. अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना, ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणापासून संमेलनाच्या ठिकाणाचा (परतीसह) राज्यपरिवहन मंडळाच्या किंवा रेल्वेच्या द्वितीयवर्गाच्या तिकिटांचा प्रवास खर्च मराठी विज्ञान परिषदेकडून देण्यात येतो. तसेच त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्थाही परिषदेतर्फे करण्यात येते.

मार्गदर्शन म्हणून वरील मुद्दे सुचवले आहेत. त्यांपैकी एक अथवा अधिक मुद्दे, एखाद्या विषयाला गैरलागू असण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यावी.

महत्त्वाची सुचना : सर्वप्रथम मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्वनोंदणी केल्यावर लागलीच गुगल फॉर्म, तुमचा नोंदणी क्रमांक आणि सुचना इत्यादी माहिती आपल्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठवली जाईल. (आपला इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर तपासावा). पूर्ण केलेला आपला प्रकल्पअहवाल पीडीएफ स्वरूपात, सादरीकरणाची सारांश चित्रफितीची शेअर्ड-लिंक आणि प्रकल्पअहवाल त्याच विद्यार्थ्याने केला असल्याचे शाळा-मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र यांसह गुगल फॉर्मद्वारे पाठवायचा आहे. प्रकल्प अहवालाची एक प्रत विद्यार्थ्यांनी स्वत:जवळ अवश्य ठेवावी.

प्रकल्पाचा विषय निवडण्यासाठी उदाहरणादाखल विषयसूची

  • परिसरातील विज्ञान.
  • सौरऊर्जा- उपकरणे, उपयोगिता, सद्यस्थितीत वापर, फायदे, मर्यादा आणि प्रसारासाठी पर्याय.
  • विविध धातू आणि आपण: धातूंचे उपयोग, आपल्या दैनंदिन जीवनातील त्यांचे महत्त्व.
  • वस्त्रे- प्रकार/उपयोग/गुणधर्म; नमुन्यांसहित.
  • धान्य, भाजीपाल, फळे इ. आपल्या गावात/शहरात कोठून येतात? त्याचे विश्लेषण. यांपैकी आपल्या गावातील उत्पादन किती टक्के? उर्वरित आयात केल्या जाणार्‍या मालापैकी काही वस्तू तरी आपण आपल्या गावामध्ये उत्पादित करू शकतो का? मार्ग कोणते?
  • कागदाचा वापर आणि पर्यावरण- वेगवेगळे उपाय, पुनर्वापराचे मार्ग, बचतीचे मार्ग.
  • आपल्या भागात आढळणारे वृक्ष, त्यांचे गुणधर्म, उपयोग- सर्वेक्षण.
  • विद्यार्थ्यांना लागणारी शैक्षणिक साधन सामग्री आणि त्याचा होणारा अपव्यय.
  • परिसरातील जैवविविधता (वनस्पती, प्राणी, पक्षी कीटक इ.).
  • परिसरातील जैवविविधतेचे सांख्यिकी सर्वेक्षण

 

नमुना प्रकल्प  Download