राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन

दहावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन (२०२२)

अंतर्गत व्ही. डी. चौगुले आणि मो. मु. मोहिले पारितोषिक योजना

संमेलन : दि. १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२२    स्थळ : ठाणे

मराठी विज्ञान परिषदेतर्फे पहिले बाल विज्ञान संमेलन २४,२५ व २६ डिसेंबर, १९९५ या कालावधीत मुंबईत संपन्न झाले. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील आठ विद्यार्थी याप्रमाणे एकूण २४० विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. पहिल्या संमेलनास फारच उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि मग पुढे दर तीन वर्षांनी ‘राज्यपातळीवर बाल विज्ञान संमेलन’ भरविण्यात येऊ लागले. आतापर्यंत, डिसेंबर १९९८- पाली (जि. रायगड), जानेवारी २००२- पन्हाळा (जि. कोल्हापूर), नोव्हेंबर २००४- औरंगाबाद, २००७- अमरावती, २०१०- वणी (जि. यवतमाळ), २०१३- जालना, २०१६- जळगाव आणि २०१९- मुंबई, अशी नऊ वेळा राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलने पार पडली. या संमेलनांदरम्यानच्या मधल्या दोन वर्षात अशी संमेलने तालुका पातळीवर परिषदेच्या विभागांद्वारे घेतली जातात.

बाल विज्ञान संमेलनात ८वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना, त्यांनी त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून, त्यावर विचार करून, ते समजून घेत, त्यांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करून तसेच, काही निष्कर्षाप्रत येऊन त्यावर अभ्यासप्रकल्प सादर कारायचा असतो. आवश्यक तिथे शिक्षकांचे मार्गदर्शनही ते घेऊ शकतात. हे केलेले प्रकल्प विद्यार्थ्यांनी संमेलनात परिक्षकांसमक्ष सादर करायचे असतात, त्यांच्या प्रश्नांना सामोरे जायचे असते. यासाठी गुणानुक्रमे प्रथम  येणाऱ्यांस व्ही. डी. चौगुले परितोषिक (शालेय गट- ८वी ते १०वी) आणि कै. मोरेश्वर मुकुंदराव मोहिले पारितोषिक (कनिष्ठ महाविद्यालयीन गट- ११वी, १२वी), अशी पारितोषिके दिली जातात.

या पारितोषिक योजनांच्या अधिक माहितीसाठी

पारितोषिक योजनेत सादरीकरणासाठी निवडल्या जाणाऱ्या सुमारे पन्नास प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना ह्या संमेलनात उपस्थित राहता येते. संमेलनात सहभागी  विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणाशिवाय, हाताला काम मिळून, काही प्रयोग प्रत्यक्ष करून पाहता यावेत अशा कृतीसत्रांचे आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी, त्यांना त्यांच्या विज्ञान अध्यापनात साहाय्यभूत ठरतील अशा एकदोन कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

यंदाचे हे दहावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२२ दरम्यान सहकार विद्या प्रसारक मंडळ संचालित मराठी आणि इंग्रजी माध्यम, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, कळवा, ठाणे ४००६०५ येथे साजरे होणार आहे. पहिले दोन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमानंतर तिसऱ्या दिवशी एका विज्ञानविषयक संस्थेला विद्यार्थी+ मार्गदर्शक शिक्षकांची भेट आयोजित केली जाणार आहे.

महाराष्ट्रभरातून संमेलनात सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांची तीनही दिवस राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाते. तसेच, संमेलनस्थळी पोहोचण्यासाठी किमानस्वरूप – परतीसह – प्रवासाचा खर्च परिषदेकडून दिला जातो.

अधिक माहितीसाठी