विज्ञान गीत

संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला |
लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला || धृ ||

विश्व हे होते धुक्याने वेढलेले, झाकलेले
अंधश्रद्धांनी जगाचे, मार्ग होते घेरलेले |
ज्ञानविज्ञानातुनी ये सत्य आता प्रत्ययाला
संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला || १ ||

गूढ सृष्टीचे कळाया; ध्यास ज्यांचे श्वास झाले
पीडितांचे दुःख जाता; सौख्य ज्यांना लाभलेले |
थोर या ज्ञानी जनांचा; वारसा आम्हां मिळाला
संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला || २ ||

सत्य आहे जीवनी ते; पाहण्या दृष्टी मिळावी
सत्य जे – जे ये पुढे ते; साहण्याची वृत्ति यावी
मानवासंगे जपावे सृष्टिच्याही वैभवाला
संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला || ३ ||

विश्व संचारास आता; आपणांला लाभलेले
मानवाचे हात आता; ते ग्रहांशी पोचलेले |
सिद्ध आम्हीही नवे आव्हान हे पेलावयाला
संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला || ४ ||

गीतः श्री. शंकर वैद्य आणि श्री. सतिश सोळांकूरकर; संगीतः श्री. यशवंत देव; गायनः श्रीम. मीनल देशपांडे आणि इतर