• Home
  • वृत्तांत

वृत्तांत

वर्ष २०२२ – कार्यक्रम वृत्त

वृत्तांकन १५-१६ ऑक्टो. २०२२ : मधुमेह व उच्च रक्तदाबापासून सावध रहा

 


मधुमेह व उच्च रक्तदाबापासून सावध रहा

भारतात रक्तदाब व मधुमेहींचे वाढते प्रमाण तसेच त्याचे तरुणांमध्ये आढळणारे प्रमाण चिंताजनक आहे. त्यादृष्टीने समाजात जाणीव-जागृती करण्याच्या उद्देशाने, मराठी विज्ञान परिषदेने ‘मधुमेह व रक्तदाबाशी करू या सामना’ या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन दि. १५ व १६ ऑक्टोबर २०२२ रोजी केले होते. त्यात डॉ. परितोष बघेल (सर जे.जे. आणि फोर्टीज रुग्णालयातील मानद तज्ञ) दृकश्राव्य माध्यमाद्वारे ते बोलत होते.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे जागतिक रोग असून मधुमेह शरीराच्या कोणत्याही अवयवाला होतो. एकदा हे रोग झाले, की औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. ही औषधे खूप महाग असतात. मधुमेहामुळे जगात दर मिनिटाला ८ माणसे मरतात. ह्या रोगाकडे बरेचजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे या रोगांबाबत सातत्याने प्रबोधन करणे आवश्यक आहे. ५० टक्के मधुमेही ह्रदरोगाने मरतात. १९८० ते २०२२ ह्या ४२ वर्षात जगातील मधुमेह्यांची संख्या दुपटीने वाढली असून भारत ही मधुमेह्यांची राजधानी असल्याचे प्रतिपादन डॉ. बघेल यांनी केले. आपल्याकडे ६.५ कोटी लोक मधुमेही असून, अविकसित देशात मधुमेही ७० टक्के वेगाने तर विकसित देशात ते २० टक्के वेगाने वाढत आहेत. हा रोग ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक असून फक्त रक्त तपासणीमुळे समजतो. आपण जे खातो, त्याचे रूपांतर शरीरात ग्लुकोज व मेदात होते, ते ग्लुकोज रक्तातून शरीराच्या सर्व अवयवांकडे जाते. स्वादुपिंड इन्शुलिन निर्माण करते. मधुमेहामुळे ते कमी पडू लागल्यावर ते बाहेरुन इन्शुलिन द्यावे लागते. रक्तातील साखर अनोशा पोटी १०० मिलिग्रॅम/डेसीलिटर आणि जेवण झाल्यावर दोन तासांनी १२५ मिलिग्रॅम/डेसीलिटर असेल तर मधुमेह नाही. मात्र ते ११२५/२०० असेल तर ती व्यक्ती मधुमेहाकडे वाटचाल करु लागलेली असते आणि त्यापेक्षा जास्त असेल तर तो मधुमेही असतो. मधुमेह लहान मुलांना होतो तसा तो गरोदर स्त्रियांनाही होतो. मधुमेहामुळे मेंदू, मुत्रपिंड, रक्तवाहिन्या या बाधित होऊन होऊन लकवा, ह्रदय बंद पडणे इत्यादी उद्भवते. मधुमेह होऊ नये अथवा झाल्यास नियंत्रित आहारासह नियमित व्यायाम करावा. मधुमेह झाल्यास औषधे नियमित घ्यावीत. जास्त आहार टाळावा, फास्ट फूड टाळावे आणि फळात आंबा, चिकू, द्राक्षे, ऊस, सीताफळे आणि अननस टाळावेत, हे डॉ. बघेल यांनी आवर्जून सांगितले.

उच्च रक्तदाब हाही आयुष्यभर मागे लागतो. आज जगात १२६ कोटी लोकांना उच्च रक्तदाब आहे. रक्तदाबामुळे मृत्यू लवकर येतो. मधुमेहासारखा उच्च रक्तदाबही छुपा मारेकरी असून गरीब आणि मध्यमवर्गीयात तो अधिक आढळतो. ५०टक्के लोकांना आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे माहीत नसते. भारतात ३३ टक्के लोकांना उच्च रक्तदाब आहे. ग्रामीण भागात तो २५ टक्के तर शहरात ७५ टक्के आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषात तो जास्त आहे. केरळमध्ये उच्च रक्तदाब सगळ्यात कमी आहे. वाढते वय, मद्यप्राशन, धूम्रपान, लोणची-पापडासारखे खारट पदार्थ त्याशिवाय जास्त मीठ, तेल,तूप खाणे, ताण-तणाव यामुळे हा विकार होतो. यासाठी दरमहा रक्तदाब मोजायला हवा. मधुमेह व रक्तदाब कुटुंबात कोणाला असेल, तर अधिक काळजी घ्यायला हवी.