01-01-2025 | भूविज्ञान कशासाठी?

आज बुधवार, दिनांक १ जानेवारी २०२५. ‘कुतुहल’च्या सर्व वाचकांचे या सदराच्या विसाव्या वर्षात सहर्ष स्वागत आहे. यंदाच्या वर्षी आपण पाषाणांचा अभ्यास करणारा भूविज्ञान (जिऑलॉंजी) हा विषय घेत आहोत. भूवैज्ञानिक थोडेसे नैराश्याने म्हणतात, ‘वीस वर्षाने आमची पाळी आली.’ ते काही का असेना, पण या विषयाबद्दल फार थोड्या लोकांना माहिती असते. आणि नेमके तेच कारण हा विषय निवडायच्या मागे आहे.

पृथ्वी कशी निर्माण झाली, ती एकेकाळी कशी होती, हळूहळू पृथ्वीचे सारंचनिक भूपट्ट (टेक्टॉनिक प्लेट्स) कसे सरकत गेले, आणि जगाचा आजचा नकाशा कसा तयार झाला, आज जिथे हिमालय आहे, तिथे पूर्वी महासागर होता का, भूकंप कसे होतात, त्यांची तीव्रता कशी मोजतात, भूकंप त्सुनामीला कसे कारणीभूत ठरतात, एकेकाळी या विषयाला भूगर्भशास्त्र म्हटले जायचे, ते आता भूविज्ञान का म्हटले जाते, जमिनीखाली मिळणारी धातूंची खनिजे मानवाच्या गरजेनुसार वारंवार निर्माण होतात का, जमिनीखाली असलेले पाणी नेमके कुठे असते, ते शेकडो वर्षे तिथे राहिले तरी आपल्या उपयोगाचे असते का, या विज्ञानशाखेत संशोधन करणारी भारतातील संस्था कोणती, ती केव्हा स्थापन झाली, तिचे उद्देश कोणते, त्यात कोणकोणत्या परदेशी आणि भारतीय वैज्ञानिकांनी संशोधन केले, भूविज्ञानाचे शिक्षण देणार्‍या संस्था कोणत्या, या शिक्षणाचा पुढे काय उपयोग, हल्ली या विज्ञानशाखेला उपग्रहांचा कसा उपयोग होतो, भारतात आणि जगात दरडी कोसळणे, गावेच्या गावे जमीनदोस्त होणे, घरांच्या भिंतींना तडे जाणे का होते, हल्ली त्याचे प्रमाण वाढले आहे का, बदलत्या हवामानाचा धरणीवर काय परिणाम होणार, मृद्संवर्धंनासाठी म्हणजेच जमिनीची धूप होऊ न देण्यासाठी काय काय उपाय आहेत, जास्त वेगाने पाणी वाहून नेणा-या ब्रह्मपुत्रेसारख्या नद्यांची पात्रे काठाची धूप होत असल्याने रुंद होत आहेत का, त्यामुळे काठावरच्या वस्तीला धोका पोहोचत आहे का, त्यावर कोणते उपाय आहेत, असे नाना प्रश्न या वर्षी आपण या सदरात हाताळणार आहोत.

सध्या आमच्याकडे उपलब्ध आलेल्या लेखकांमधे या विषयातील आम्हाला माहीत नसलेल्या लेखकांची भर पडू शकते, त्यांना आम्ही लेखन करण्याचे आवाहन करीत आहोत. वाचकांनीही रोजचे सदर वाचल्यावर त्यांना पडलेले प्रश्न या सदराखाली दिलेल्या इ-मेलवर विचारून त्याची उत्तरे लेखकांकडून मिळवावीत, जेणेकरून हे सदर परस्परसंवादी राहील.

चला तर मग! उद्यापासून यातील एकेक विषय आपण वाचायाला सुरुवात करू या.

. पां देशपांडे