
पृथ्वीवर उपलब्ध असणार्या पदार्थांवर मानवाचे जीवन अवलंबून असते. दूधदुभते, मांस, खाद्यतेल, लाकूड, चामडे, या गोष्टी जशा आपल्याला सजीवांपासून मिळतात, तशाच लोहमार्गासाठीची खडी, वाहनांसाठीचे खनिज तेल, विद्युत् उपकारणांसाठी लागणारे अभ्रक आणि असे असंख्य निर्जीव पदार्थ आपल्याला पाषाणांपासून मिळतात. पाषाणांचे आणि मानवाचे नाते युगायुगांचे आहे. आपले पूर्वज डोंगरांमधल्या गुहांमध्ये आसरा घेत असत. रात्री रानटी श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी गुहेच्या तोंडाशी ते मोठाल्या शिळाच ठेवत असत. हत्यारेही दगडांचीच बनवत.
जाते, पाटा-वरवंटा, दक्षिणेकडे वापरला जाणारा रगडा, अशा दगडांच्या वस्तू आता शहरी भागात दिसत नसल्या, तरी ग्रामिण भागात अजूनही वापरात आहेत. पूर्वी परसदारी विहिरीजवळ धुणे धुण्यासाठी भक्कम दगड असे. शिवाय पाणी भरून ठेवण्यासाठी दगड कोरून केलेले हौदही असत. त्यांना डोणी म्हणत. जीवनशैली बदलली, तशा या वस्तू हळूहळू हद्दपार झाल्या.
पण बांधकाम करणे मात्र आजही पाषाणांशिवाय दुरापास्त आहे. जगभरात विविध प्रकारचे पाषाण वापरून कित्येक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक इमारती बांधल्या आहेत. या आकर्षक इमारती म्हणजे आपल्याला पाषाणांकडून मिळालेली देणगीच आहे. सार्या जगात कित्येक इमारती जागतिक वारसा स्थळे म्हणून आपण जपून ठेवत आहोत. कोणार्कचे सूर्य मदिर, गुजरातेतील पाटणची ‘राणीनी वाव’ (राणीची विहीर) किंवा अबूजवळच्या दिलवाडा येथील संगमरवरी मंदिरे पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. त्या मंदिरातल्या देखण्या मूर्ती पाषाणांतूनच घडल्या आहेत. आणि बांधकामासाठी लागणार्या सीमेंट, विटा, फरशा, वाळू; इतकेच काय, पण लोखंडसुद्धा पाषाणांतूनच मिळते.
खडकांचा अभ्यास इतर अनेक कारणांनी मानवाच्या उपयोगी पडतो. धरणे, पूल, लोहमार्ग, बोगदे अशा नागरी बांधकामांसाठी नेमके कोणते ठिकाण सुरक्षित आहे, हेदेखील भूविज्ञानाच्या सहाय्यानेच ठरवले जाते. तिथल्या पाषाणप्रस्तरांची संरचना त्या बांधकामासाठी अनुकूल आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागते.
काही खडकांमधे आढळणारे जीवाश्म म्हणजे ज्या काळात ते खडक निर्माण झाले, त्या काळातल्या सजीवांचे अवशेष होत. जीवाश्मांच्या अभ्यासातून प्राचीन काळातील सजीवांची माहिती मिळते, सजीवांमधे उत्क्रांती कशी झाली याचेही आकलन होते. शिवाय अलिकडे जागतिक स्तरावर पाण्याची समस्या तीव्र होऊ लागली आहे. भूजलसाठ्यांचे पुनर्भरण कसे करता येईल, आणि त्यामधे होणारे प्रदूषण कसे थांबविता येईल, याचाही विचार भूविज्ञानात होऊ लागला आहे. काही खनिजांचे स्फटिक दुर्मिळ, आकर्षक आणि टिकाऊ असतात. त्यांना रत्नांचा दर्जा दिला जातो. त्यांचीही माहिती भूविज्ञानात मिळवली जाते.
डॉ. विद्याधर बोरकर