माती हा जीवसृष्टीचा मूलाधार आहे. मातीच्या सूक्ष्मकणांच्या पृष्ठभागावर घडत असलेल्या जैवरासायनिक क्रिया जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे खरे साक्षीदार आहेत. कारण त्याचे परिणाम वैश्विक असतात. कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टीच्या संशोधनाचेएक तंत्र आहे. यात प्रामुख्याने चार गोष्टींचे मापन केले जाते. १. मातीत संख्येने किंवा आकाराने वाढणारा असा एखादा घटक आहे का? २. मातीत एखादा जननक्षम घटक आहे का? ३. मातीत एखाद्या प्रकारची जैवरासायनिक क्रिया घडते आहे का? ४. मातीत प्रकाशसंश्लेषण क्रिया शक्य आहे का?
चंद्रावर उतरून माणूस तिथल्या मातीचे नमुने पृथ्वीवर घेऊन आला, परंतु त्यात सजीवाच्या अस्तित्वाचा कुठलाच पुरावा मिळाला नाही. अद्याप माणूस मंगळावर उतरुही शकलेला नाही. मंगळावर वायकिंग, फोनिक्स, क्युरिओसिटी अशा यानांनी तेथे पाठवलेल्या जीवरसायन प्रयोगशाळेतच मातीचे नमुने उबवून तीन विविध प्रयोग केले.
पहिला प्रयोग होता प्रकाशसंश्लेषण क्रियेसंदर्भात मातीचे विश्लेषण. पृथ्वीवरील प्रकाशसंश्लेषण करणारे सजीव पुरातन समजले जातात. त्यांना आर्किबॅक्टेरिया असे म्हणतात. किरणोत्सारी कार्बन डायऑक्साइड वापरुन त्याचे पिष्टमय पदार्थात रूपांतर होते का, आणि झाल्यास त्याचे ७००० अंश सेल्सिअस तापमानला खंडन होऊन किरणोत्सारी कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो का, हे बघितले गेले.
दुसर्या प्रयोगात कार्बन डायऑक्साइड, नत्र, मिथेन, हायड्रोजन, प्राणवायू असे वायू तसेच विविध १९ अॅमिनो आम्ले व जीवनसत्वांचा वापर करून ते मातीतील जैवरासायनिक क्रियेत कितपत सहभागी होतात, याचा अभ्यास केला गेला. यासाठी वायुविच्छेदन यंत्राचा वापर केला गेला.
तिसरा प्रयोग होता चयापचय क्रियेचे विश्लेषण. पृथ्वीवरील सजीव ज्या मूलभूत घटकांवर जगतो त्याच घटकांवर मंगळावरील सजीव जगतो का? यात विविध प्रकारची खाद्ये मातीत मिसळून ती ११ दिवस उबवली गेली. जर मातीतला सजीव ते खाद्य वापरू शकला तर अर्थातच कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडावा अशी अपेक्षा होती.
मंगळाच्या मातीत अद्यापतरी जीवसृष्टीचे पुरावे मिळालेले नाहीत. मग… परग्रहावर पृथ्वीप्रमाणे कार्बन आधारित सजीव नसून इतर मूलद्रव्यावर आधारित असा सजीव असू शकतो का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.
मंगळावर कमी दाबाचे हवामान, अतिशीत तापमान, ओझोन थराच्या अभावामुळे उत्सर्जित किरणांचा प्रचंड मारा आणि निकृष्ट दर्जाची माती यामुळे धान्योत्पादन अशक्य आहे. भविष्यात मानवाचे मंगळावर अवतरण झालेच तर….! अशा प्रतिकूल परिस्थितीत तेथे कृत्रिम एलईडी दिव्यांचा वापर करून विशेष दाबाखाली कार्य करणार्या हरित गृहाचा आराखडा ‘नासा’ येथे तयार केला जात आहे.
डॉ. रंजन गर्गे