अंटार्क्टिकावर लाल रंगाचा बर्फ आढळून आला आहे. ही बर्फात झालेली लाल रंगाच्या शैवालाची वाढ आहे. या लाल रंगाची शैवाले ही इतर शैवालांप्रमाणेच बर्फाळ परदेशात, ओलसर जमिनीवर किंवा समुद्राच्या, नद्यांच्या, तलावाच्या पाण्यातही दृष्टीस पडतात.
शैवाल हे एकपेशीय सजीव आहेत. ती मिलिमीटरच्या हजाराव्या काही भागांइतकी सूक्ष्म आकाराची असू शकतात किंवा काही मीटर आकाराची प्रचंडही असू शकतात. आपल्या वातावरणातील प्राणवायूचा मोठा भाग हा या सूक्ष्मशैवालांकडून पुरवला जातो. तसेच ही शैवाले म्हणजे इतर अनेक सजीवांचा आहारही आहेत. या कारणास्तव, या सूक्ष्मशैवालांचे पृथ्वीवरील जीवनचक्रातील महत्व अनन्यसाधारण आहे. बहुसंख्य शैवालांना असणारा हिरवा रंग हा अर्थातच त्यांच्यातील हरितद्रव्यामुळे (क्लोरोफिल) येतो. हे हरितद्रव्य प्रकाशसंश्लेषणाद्वारे कार्बन डायऑक्साइडचं विशिष्ट प्रकारच्या साखरेच्या रेणूंत रूपांतर करण्यात मुख्य भूमिका बजावते. याच रासायनिक क्रियेतून प्राणवायूचीही निर्मिती होते.
लाल रंग धारण करणाऱ्या शैवालांकडे क्लोरोफिल ‘सी’ व ‘डी’ सुद्धा असते. मात्र त्यांना लाल रंग हा त्यांच्याकडील कॅरॉटेनॉइड या रसायनामुळे येतो. हे कॅरॉटेनॉइड शैवालातील हरितद्रव्याचे संरक्षण करते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांचा या हरीतद्रव्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काही प्रजातींची शैवाले कॅरॉटेनॉइडसारख्या द्रव्याची निर्मिती करतात. हे कॅरॉटेनाइड अतिनील किरणांचा काही भाग शोषून घेतात. बर्फात वाढणाऱ्या लाल शैवालाच्या काही कॅरॉटेनॉइडयुक्त प्रजातींमुळे तिथला बर्फ लाल दिसायला लागतो. त्यामुळे या लाल शैवालांची अतिवाढ ही हवामानाच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता आहे.
बर्फाच्या लाल रंगाला कारणीभूत ठरणारी क्लमायडोमोनास निवालिस किंवा रॅफिडोनेमा या लाल शैवाल प्रजातींचा हवामानाशी असलेला थेट संबंध दिसून आला आहे. या सूक्ष्मजीवातील ‘एस्टाक्झानथिन’ हा लाल रंगद्रव जास्तीच्या सूर्यप्रकाशाचे रूपांतर उष्णतेत करतो. हे रंगद्रव्य उत्तम अॅंटीऑक्सिडंट आहे. या शैवालाला कालिंगडासारखा वास येतो. हे शैवाल माणसासाठी विषारी असते.
लाल रंगांच्या शैवालांकडून कॅरॉटिनॉइडची निर्मिती ही जरी स्वसंरक्षणासाठी होत असली तरी, या शैवालांचे वाढलेले प्रमाण उलट स्वरूपाचे परिणामही घडवू शकते. पांढरा शुभ्र बर्फ हे सूर्यकिरण मोठ्या प्रमाणात परावर्तित करतो. याउलट, लाल रंगाचा बर्फ हे सूर्यप्रकाशकिरण मोठ्या प्रमाणात शोषून घेतो. या लाल शैवालांच्या अस्तित्वामुळे बर्फाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता वीस टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचं आढळलं आहे. प्रकाश अधिक प्रमाणात शोषला जात असल्यामुळे, लाल रंगाचा बर्फ तापमानवाढीस कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले आहे.
डॉ. रंजन गर्गे