११-६-२०२५ | पृथ्वीचा वितळू लागलेला ‘तिसरा ध्रुव’

शेकडो तज्ज्ञांनी संकलित केलेल्या एका अहवालानुसार, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात बर्फाळ प्रदेशांपैकी एक वेगाने वितळू लागला आहे. तो आहे पृथ्वीचा ‘तिसरा ध्रुव’! जेव्हा आपण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांचा विचार करतो, तेव्हा आपल्यासमोर दोनच ध्रुवीय प्रदेश येतात, उत्तर आणि दक्षिण. तथापि, चीनच्या दक्षिणेला आणि भारताच्या उत्तरेला, या दोन प्रदेशांसारखाच एक बर्फाच्छादित क्षेत्र आहे. ते ‘तिसरा ध्रुव’ म्हणून ओळखले जाते. पृथ्वीवरील गोठलेल्या पाण्याचे हे तिसरे सर्वात मोठे क्षेत्र आहे. जरी ते दोन्ही ध्रुवीय प्रदेशांपेक्षा खूपच लहान असले, तरी तेही खूप विशाल असून या क्षेत्राने सुमारे ४६,००० हिमनद्यांसह एक लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. हिंदुकुश-हिमालयीन क्षेत्राला पृथ्वीचा ‘तिसरा ध्रुव’ म्हणून संबोधले जाते; ते त्यावरील हिमनद्यांचे आच्छादन पाहूनच.

हवामानबदल आणि हिमविलयन क्षेत्रात संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांनी असे प्रतिपादन केले आहे, की या भागात सध्या चालू झालेले हिमविलयन असेच चालू राहिले, तर या क्षेत्रात राहणाऱ्या १.३ अब्ज लोकांवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. असे असूनही जागतिक हवामान अहवालांमधे या क्षेत्राला कमी महत्त्व दिले गेले आहे असे दिसून येते. कॅनडातल्या नॉर्दर्न ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील हिम आणि बर्फ तज्ज्ञ जोसेफ शी यांच्या मते ‘हवामान बदल आंतरशासकीय समिती’च्या (इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अंतिम अहवालात ‘तिसरा ध्रुव हे माहितीचे मोठे कृष्णविवर आहे’, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. आता मात्र या क्षेत्रावर बरेच लक्ष केंद्रित केले गेले आहे; आणि या अहवालातल्या माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न होत आहे

पृथ्वीचा तिसरा ध्रुव म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र हिमालयातल्या कैलास, कांचनजंगा आणि एव्हरेस्ट अशा काही सर्वोच्च पर्वतशिखरांचे घर आहे. शिवाय, या क्षेत्रात काराकोरम, हिमालय, हिंदुकुश पर्वतरांगांचा; तसेच तिबेट पठाराचा समावेश होतो. आशियामधल्या सर्वात दहा मोठ्या नद्या इथून उगम पावतात. हवामानातबदलांवर सतत निरीक्षण आणि नियमन करण्यासाठी पृथ्वीचे दोन्ही ध्रुवीय प्रदेश तर महत्त्वाचे आहेतच, कारण तापमानवाढीच्या संदर्भात ते विशेष संवेदनशील आहेत. पण ‘तिसरा ध्रुव’, समुद्रसंपाटीपासून ४,५०० मी. उंचीवर असल्यामुळे तापमानातील बदलांसाठी तोदेखील संवेदनशील आहे. या क्षेत्रात बदलत जाणारी बर्फाची स्थिती हवामान बदलाचा सुस्पष्ट पुरावा मानला जातो. इथला बर्फ वेगाने वितळणे, हे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे संकेत देत आहेत, हे निश्चित.

डॉ. श्रीकांत कार्लेकर