११-०७-२०२५ | एडवर्ड जेन्नर

इंग्लंडच्या ग्लाऊसेस्टरशायर परगण्यातल्या बर्कली, शहरात १७ मे १७४९ला एडवर्ड जेन्नर जन्म झाला. लसीची संकल्पना मांडणे, गोस्तन लसीने मनुष्यातील देवीरोगाची तीव्रता घटवता येईल हा विचार देणे. प्रत्यक्षात देवीची लस निर्मिणे, एवढी अफाट कामगिरी एडवर्ड जेन्नरनी करून दाखवली. त्यामुळे ‘रोगप्रतिक्षमता शास्त्राचा जनक’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. देवीरोग पूर्वी अतिप्राणघातक मानत, कारण देवीरोगाची साथ आली की सरासरीने प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्य दगावत. जगलेले लोक,देवीचे व्रण जन्मभर अंगावर वागवत. अनेकाना डोळ्यात फोड झाल्यास आंधळेपण, कानात झाल्यास बहिरेपण येण्याचा धोका असे. बालवयात एडवर्डला सौम्य देवीरोग्याच्या फोडाच्या खपलीची भुकटी हुंगायला दिली होती. असे केल्याने प्राणघातक स्वरूपाचा देवी रोग होत नाही असा लोकांचा अनुभव होता.

लंडनमध्ये एडवर्डनी वैद्यक-शस्त्रक्रिया शिकून एकविसाव्या वर्षी प्रथम वैद्यकीय पदवी मिळवली. मूळ गावी जाऊन वीस वर्षे रुग्णसेवा करून पदव्युत्तर पदवी, एम.डी. मिळवली. डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचे कार्य ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषि क्षेत्रातील होते. त्यांच्याकडे पशुधन भरपूर होते. १७८८ साली इंग्लंड मध्ये देवीची साथ मोठ्या प्रमाणात आली होती. त्यावेळी डॉक्टर जेन्नर यांच्या गावातील बरेच लोक आश्चर्यकारकरित्या बचावले होते. जेन्नर यांच्या लक्षात आले की जे बचावले होते त्यांना गाईतील देवीसदृश रोग आधी होऊन गेला होता आणि त्यांना या साथीत देवीची कुठलीच लक्षणे दिसत नव्हती. गावातील लोकांना देवीचा रोग झाला नाही, हे सुद्धा त्यांच्या निरीक्षणातून सुटले नव्हते.

१७९६ साली जेन्नर यांनी जेम्स फिफ्स नावाच्या एका ८ वर्षाच्या मुलावर आपले प्रयोग सुरू केले. जेम्सच्या हाताला दोन बारीक जखमा केल्या आणि त्यात गाईच्या पुरळातील स्त्राव टोचला. त्यानंतर मुलाला थोडा ताप आला आणि तो बरा झाला. एका आठवड्यानंतर त्याच्या दुसर्‍या जखमेत त्याने माणसाच्या देवी पुरळातील स्त्राव टोचला तरी त्याला देवीचा प्रादुर्भाव झाला नाही. गाईच्या या देवीसदृश रोगला लॅटिन भाषेत ‘व्हॅक्सिनिया’ असे म्हणत. म्हणून त्यांच्या या उपचार पद्धतीचे नाव त्यांनी ‘व्हॅक्सिनेशन’ असे ठेवले. १७९८ मध्ये सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये त्यांनी या पद्धतीचे जाहीर प्रात्यक्षिक करून दाखवले. शेवटी १९८०मध्ये संपूर्ण जग देवीरोगमुक्त झाले. संसर्गजन्य रोगाशी लस वापरून लढता येते हे डॉक्टर जेन्नरनी सिद्ध केले.

२६ जानेवारी १८२३ या दिवशी अर्धांगवायुचा झटका येऊन त्यांची प्राणजोत मालवली.

नारायण वाडदेकर