१२-११-२०२५ | जैविक युद्ध

युद्धभूमीवर शत्रूला केवळ शस्त्रांनी नव्हे तर रोगराईनेही संपवण्याचा विचार फार पूर्वीपासून मानवजातीने केला आहे. पूर्वी तलवारी आणि भाल्यांनी लढल्या जाणाऱ्या लढाया आज अत्याधुनिक तंत्रज्ञान, आणि जैविक युद्धापर्यंत पोहोचल्या आहेत. जैविक युद्धामध्ये कोणताही बॉम्ब किंवा सैनिक न वापरता शत्रू राष्ट्रामध्ये साथीचे रोग पसरवून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा पूर्ण ऱ्हास घडवून आणता येतो. या युद्धामध्ये रोगजंतू जसे की विषाणू, जीवाणू, किंवा त्यांचे जैव-उत्पादक (जैविक विष) वापरून शत्रूराष्ट्रामध्ये हल्ला चढवला जातो. हे रोगजंतू प्रयोगशाळेत वाढवून हवेतून किंवा अन्न-पाण्यातून पसरवले जातात. या रोगजंतूना जैविक अस्त्र असे संबोधले जाते. जैविक युद्धाचा इतिहास प्राचीन काळापासून आढळतो. हित्तीलोक, सिथियन, अॅलसिरियन आणि मंगोल यांसारख्या अनेक समाजांनी संक्रमित जनावरे, विषारी बाण, दूषित पाणी आणि मृतदेह वापरून शत्रूंवर रोग पसरवले.

सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रगतीमुळे आधुनिक जैविक युद्धाची सुरुवात झाली. लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉख यांनी रोगकारक सूक्ष्मजंतूंची ओळख करून त्यांना प्रयोगशाळेत वाढवण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या पद्धती विकसित केल्या. जैविक युद्धात वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्मजंतूंना (सिलेक्ट एजंट्स)   धोक्याच्या स्तरानुसार श्रेणी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहे.

श्रेणी ‘अ’ मध्ये अत्यंत घातक आणि सहज पसरणारे रोगजंतू येतात, जे मोठ्या प्रमाणावर आजार व मृत्यू घडवू शकतात. उदा. अ‍ॅंथ्रॅक्स, प्लेग, स्मॉलपॉक्स.

श्रेणी ‘ब’ मध्ये कमी मृत्युदर असलेले पण आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण करणारे जैविक विष आणि रोगजंतू असतात. उदा. क्यू फीवर, रायसिन.

श्रेणी ‘क’  मध्ये भविष्यात धोका निर्माण करू शकणारे रोगजंतू येतात. उदा. निपाह विषाणू, हँटा विषाणू, पिवळा ताप.

जैविक युद्धाचे गंभीर प्रयोग पहिल्या महायुद्धात जर्मनीने अँथ्रॅक्स आणि ग्लँडर्सचे रोगजंतू वापरून केले. दुसऱ्या महायुद्धात जपानने ‘युनिट ७३१’ या गुप्त प्रयोगशाळेत ब्रूसेला, अँथ्रॅक्स, प्लेग, टायफॉइडसारख्या जीवाणूंवर प्रयोग करून त्यांचा शस्त्र म्हणून वापर केला. २००१ मध्ये अमेरिकेत अँथ्रॅक्सने भरलेली पत्रं पाठवून जैविक दहशतवादाचा प्रसंग घडवण्यात आला. जैविक आणि विषारी शस्त्रांच्या भीषण परिणामांमुळे जगभर चिंता वाढत आहे. १९७५ मध्ये जैविक व विषारी शस्त्रसंधिद्वारे जैविक शस्त्रांच्या विकास व उत्पादनावर बंदी घालण्यात आली. मात्र, या कराराच्या अस्तित्वानंतरही काही दुर्मिळ गट, दहशतवादी संघटना आणि कराराचे पालन न करणारे देश जैविक शस्त्रांचा धोका निर्माण करत आहेत.

डॉ. विनायक पांडुरंग सुतार