रेबीज हा विषाणूजन्य प्राणिसंक्रमित रोग आहे. हा रोग मांजर, वटवाघुळे, पाळीव जनावरे आणि वन्यप्राणी यांनाही होतो. दिल्लीत रेबीज या रोगाने सध्या धुमाकूळ घातला आहे.
१९व्या शतकात लुई पाश्चर यांनी रेबीजवर लस तयार केली. १८८५ साली जोसेफ मेस्टर नावाच्या ९ वर्षांच्या मुलाला एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीररीत्या जखमी केले होते. मुलाचा मृत्यू निश्चित होता. पाश्चर यांनी धाडस करून या मुलाला आपली प्रयोगात्मक लस दिली आणि तो आश्चर्यकारकरित्या बरा झाला.
रेबीजचा विषाणू संक्रमित प्राण्याच्या लाळेमधून पसरतो. कुत्र्याचे चावणे, ओरखडा लागणे (लाळ संक्रमित पंजामुळे) किंवा जखमेवर संक्रमित लाळ लागणे हे रोगप्रसाराचे मुख्य मार्ग आहेत. हा विषाणू मज्जातंतूच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचतो, परिणामी त्यांचे कार्य बिघडते. विषाणूच्या शिरकावापासून लक्षणे दिसण्यासाठी साधारणतः २०ते ९० दिवस इतका कालावधी लागतो. पण हा कालावधी काहीवेळा काही दिवस ते अगदी वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतो. शरीरावर चावा घेतलेली जागा आणि प्रवेशित विषाणूंची संख्या यावरून हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. सुरुवातीला ताप, अशक्तपणा, डोकेदुखी आणि चावलेल्या जागी मुंग्या येणे किंवा जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात. रेबीजचे दोन प्रकार आढळतात.
फ्युरिअस रेबीज (उग्र प्रकार) – या प्रकारात रुग्ण खूप चंचल, आक्रमक होतो, भ्रम निर्माण होतात, हालचालीत अडथळे येतात. गिळताना घश्यामध्ये प्रचंड वेदना होतात, त्यामुळे पाणी पाहून भीती वाटते (हायड्रोफोबिया) तसेच वाऱ्याचीही भीती (एरोफोबिया) निर्माण होते. काही दिवसांत हृदय व श्वसनक्रियेवर परिणाम होऊन मृत्यू होतो.
पॅरालिटिक रेबीज (लकवा प्रकार) – हा प्रकार साधारण २०% रुग्णांमध्ये दिसतो. यात लक्षणे मंद गतीने दिसतात. जखमेपासून हळूहळू स्नायूंना लकवा येऊ लागतो. शेवटी रुग्ण कोमात जातो आणि मृत्यू होतो.
हा रोग लक्षणे दिसल्यानंतर जवळजवळ १००% प्राणघातक असतो, पण तो पूर्णपणे टाळता येतो. सर्वात प्रभावी उपाय म्हणजे श्वानांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे. जागतिक आरोग्य संघटनेने २०३०पर्यंत मानवी रेबीज मृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. श्वान चावल्यानंतर जखम १५ मिनिटे साबण व पाण्याने धुवावी, नंतर रेबीजची लस आणि गरजेनुसार अँटीबॉडी इंजेक्शन घेणे अत्यावश्यक आहे. पशुवैद्य, प्रयोगशाळा कर्मचारी आणि वन्यजीवांशी संपर्क येणाऱ्यांना अगोदरच प्रतिबंधक लस घ्यावी लागते.
डॉ. विनायक पांडुरंग सुतार