वैज्ञानिक आणि प्रौद्योगिकी संशोधनपरिषदेच्या (सीएसआयआर) अखत्यारीत असणारे ‘पेशीकीय व आण्विक जीवशास्त्र केंद्र (सेंटर फॉर सेल्युलर अॅंड मॉलिक्युलर बायॉलॉजी-सीसीएमबी)’ हे मूलभूत जीवशास्त्रात संशोधन करणारे भारतीय केंद्र हैदराबाद इथे कार्यरत आहे. १ एप्रिल १९७७ रोजी अंशतः स्वायत्तता असलेली क्षेत्रीय प्रयोगशाळा म्हणून या केंद्राची स्थापना झाली. डॉ. पुष्प मित्र भार्गव हे या केंद्राचे संस्थापक संचालक झाले. स्थापनेच्यावेळी या प्रयोगशाळेत जैवरसायन (बायोकेमिस्ट्री) हा एकमेव विभाग होता. १९८१-८२ यावर्षात या केंद्राला पूर्णपणे विकसित राष्ट्रीय प्रयोगशाळेचा दर्जा प्राप्त झाला. सर्व सोयीसुविधांयुक्त प्रशस्त जागेत हे केंद्र २६ नोव्हेंबर १९८७ रोजी स्थलांतरीत झाले.
आधुनिक व प्रगत जीवशास्त्रात उत्कृष्ट दर्जाचे मूलभूत संशोधन व प्रशिक्षण आयोजित करणे तसेच जीवशास्त्राच्या विविध शाखांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रीकृत राष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक जीवशास्त्रातील मूलभूत संशोधन, समाजाभिमुख संशोधन आणि व्यवसायाभिमुख उपयोजित संशोधन हे तीन महत्त्वाचे कार्यक्रम या केंद्रात चालू आहेत. यामध्ये आदिकेंद्रिकी (प्रोकेरियोटिक), सकेंद्रकी (युकेरियोटिक) आणि पोषिता परजीवी (होस्ट पॅरासाईटस्) पेशींमधील अन्योन्यक्रिया, उत्क्रांती व विकास तसेच जनुकनियमन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या केंद्राने डीएनए अंगुलीमुद्रणचे (डीएनए फिंगरप्रिंटिंग) तंत्रज्ञान निर्मितीमध्ये जगात तिसरे स्थान पटकावले आहे. डीएनए अंगुलीमुद्रणचा पहिला फोटो या केंद्राने भारताच्या न्यायव्यवस्थेला सादर केला होता. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गंभीर गुन्ह्यांचा व गुन्हेगारांचा शोध लावण्यात तसेच विमान अपघातातील मृतांची ओळख पटण्यात झाला आहे. जनुकांच्या अभ्यासातून विविध रोगजनक विषाणूंमुळे होणाऱ्या तसेच अनुवंशिक आजारांच्या निदानांचे संचही तयार केले जातात. कोविडच्या संक्रमणाच्या काळात या केंद्राने निदानसंच पुरवले तसेच लस व औषधांच्या निर्मितीसाठी सहाय्य केले. भारतनिर्मित कर्करोगांवरील औषधांच्या चाचण्या आणि प्रमाणीकरण या केंद्रात केले जाते. कीड प्रतिरोधक पिकांच्या जातींची निर्मितीही या केंद्रात केली जाते.
आशियातील वाघ आणि सिंहाच्या संपूर्ण जनुकीय माहितीचे संवर्धन तसेच विविध अनुवंशिक आजार यावरील संशोधनही हे केंद्र करत असते.
हे केंद्र भारतासह अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांतील विद्यापीठे व संशोधन संस्था यांच्याबरोबर प्रायोजित संशोधनप्रकल्पही राबवते.या केंद्राला युनेस्कोने पेशी व जीवशास्त्रातील समाजाभिमुख उत्तम संशोधन व तंत्रज्ञानासाठी ‘उत्कृष्ट केंद्र’ म्हणून गौरविले आहे; तसेच इटलीच्या तिसऱ्या जागतिक विज्ञान अकादमीने संशोधन व प्रशिक्षण यासाठीचे उत्कृष्ट दक्षिणी केंद्र असे घोषित केले आहे.
अनघा शिराळकर