४ एप्रिल १९३८ रोजी कोलकाता पासून १९० किलोमीटर अंतरावर असलेल्या साइनथिआ या गावी आनंद मोहन चक्रवर्ती यांचा जन्म झाला. बेळूरमठ येथील रामकृष्ण मिशन विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले. कोलकाता येथील सेंट झेविअर कॉलेजमध्ये बी.एस्सी. आणि पुढे कोलकाता विद्यापीठात एम.एस्सी. आणि पीएच.डी. चा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. १९६५ साली चक्रवर्ती अमेरिकेला गेले. त्यांनी प्रोफेसर आय. सी. गुनसालूस यांच्या मार्गदर्शनाखाली इलिनॉइस विद्यापीठात मॉलेक्युलर जेनेटिक्स या विषयात संशोधनाला सुरुवात केली.
आनंद मोहन चक्रवर्ती हे भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या सर्वच शास्त्रज्ञांपुढे समुद्रातील तेलाच्या गळतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या गळतीमुळे जलपरिसंस्था धोक्यात आल्या होत्या. या प्रश्नाला उत्तर दिले ते डॉ. आनंद चक्रवर्ती या भारतीय शास्त्रज्ञाने.
कार्बन आणि हायड्रोजन यांनी बनलेली हायड्रोकार्बन्स (तेल) सुडोमोनास प्यूटिडा नावाचा जीवाणू खाद्य म्हणून वापरू शकतो. याला बायोरेमीडिएशन असे म्हणतात. अशुद्ध तेल हे बर्याच विविध प्रकारच्या हायड्रोकार्बन्सचे मिश्रण असते. या जीवाणूच्या प्लासमिडवरील चार जनुके हायड्रोकार्बन्सच्या खंडनासाठी महत्वपूर्ण ठरतात, हे डॉ. आनंद चक्रवर्ती यांनी सिद्ध केले. कॅम्फर, ऑक्टेन, झायलीन आणि नेपथेन ही ती चार हायड्रोकार्बन्स. प्लासमिडच्या जनुकीय अभियांत्रिकीतंत्राने सुडोमोनास प्यूटिडा जीवाणूत या चार जनुकांचे रोपण करून त्यात उत्परिवर्तन घडवून विशेष जीवाणू ‘G’ ची निर्मित करण्यात डॉ. आनंद चक्रवर्ती यशस्वी झाले.
डॉ. चक्रवर्ती यांनी या नव्या जीवाणूसाठी एकस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. डॉ. आनंद चक्रवर्ती यांचा अमेरिकेत एकस्व अधिकारासाठी चाललेला हा लढा विज्ञानक्षेत्रात खूपच गाजला. अखेरीस १९ जून १९८० रोजी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि विज्ञान क्षेत्रात जनुक-अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून निर्माण केलेले असे अनेक सूक्ष्मजीव जगभर प्रकाशीत झाले.
‘बगिंग कॅन्सर’ आणि ‘डेअरिंग टु ड्रीम’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना अमेरिकेच्या औद्योगिक संशोधन संस्थेचा १९७५ सालचा उत्तम शास्त्रज्ञ हा पुरस्कार प्राप्त झाला. अमेरिकन सैन्यदलाचा विशेष सेवा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अमेरिकन सोसायटी फॉर मायाक्रोबायॉलॉजीचा प्रॉक्टर अँड गॅम्बल पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जैव-अभियांत्रिकी-तंत्रज्ञान या विषयातील त्यांच्या कार्याबद्दल भारतीय शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन २००७ साली त्यांना सन्मानित केले.
१० जुलै २०२० रोजी त्यांचा देहांत झाला.
डॉ. रंजन गर्गे