फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस इथे मुख्यालय असलेली आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र संस्थांची संघटना (इंटरनॅशनल युनियन ऑफ मायक्रोबायालॉजिकल सोसायटीज् – आययुएमएस) ही सूक्ष्मजीवशास्त्र विषयासंबंधीची जागतिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना १९२७ साली आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र संस्था (इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मायक्रोबायलॉजी) या नावाने झाली. १९६७ साली तिचे रुपांतर सर्व सूक्ष्मजीवशास्त्रासंबंधीच्या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत झाले. १९८० साली या संघटनेचे नामांतर इंटरनॅशनल युनियन ऑफ मायक्रोबायालॉजिकल सोसायटी (आययुएमएस) असे होऊन तिला स्वायत्तता प्राप्त झाली. १९८२ साली या संघटनेला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघटनांच्या परिषदेचे सदस्यत्व मिळाले.
आययुएमएस ही आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या (इंडियन सायन्स कौन्सिल) ४० सदस्य संघटनांपैकी एक असून ती एक आंतरराष्ट्रीय बिगरसरकारी संस्था आहे. जगातील सूक्ष्मजीवशास्त्रासंबंधीच्या सर्व संस्थांना एकत्र आणून संसर्गजन्य जीवाणूंवर नियंत्रण आणणे, सूक्ष्मजीवांची वैविध्यता टिकवणे, सूक्ष्मजीवांच्या महत्त्वासंबंधी जनजागृती करणे आणि यासाठी शाश्वत उपाययोजनेचा जागतिक पातळीवर विकास व प्रचार करणे ही मुख्य उद्दिष्टे आययुएमएसची आहेत.
जीवाणू, बुरशी, विषाणू, अन्नातील सूक्ष्मजीव, वैद्यकीय सूक्ष्मजीव इत्यादींचे निदान करून त्यांचे वर्गीकरण व नामकरण करणे, विविध सूक्ष्मजीवांचे नमुने मिळवणे आणि त्यांचे जीवशास्त्रीय प्रमाणीकरण करणे तसेच त्यांची माहिती सर्व संबंधित संस्थांना पुरवणे इत्यादींचा आययुएमएसच्या कार्यामध्ये समावेश असत. ही संघटना सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाला व संशोधनाला जगभर चालना देते, माहितीचे वितरण करते, सभा संमेलने भरवते तसेच अहवाल तयार करण्यासाठी सर्वोतोपरी मदतही करते.
आययुएमएसचे तीन विभाग आहेत. (१) जीवाणूशास्त्र व उपयोजित जीवाणूशास्त्र (२) बुरशीशास्त्र किंवा कवकशास्त्र व पेशीकेंद्रक सूक्ष्मजीवशास्त्र आणि (३) विषाणूशास्त्र. या प्रत्येक विभागाचे स्वतंत्र कार्यालय असून त्यांची उद्दिष्टे ठरलेली आहेत. या विभागांतील निरीक्षणे व संशोधन जगातील सर्वसंबंधित संस्था व संघटनांना पुरवले जाते.
आययुएमएस तिचे वैज्ञानिक कार्यक्रम सहा विशेष समिती, नऊ आंतरराष्ट्रीय आयोग आणि दोन आंतरराष्ट्रीय संघराज्ये यांच्या माध्यमांतून आयोजित करते. ३१ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघटना जगभरातील वैज्ञानिकांना एकत्र आणून सूक्ष्मजीवशास्त्रातील विविध विषयांवर सभा संमेलने आयोजित करून संघटेनेला भक्कम पाठिंबा देतात. सध्या ६५ देशांच्या ८८ राष्ट्रीय संस्था आणि १४ सहयोगी सदस्य आययुएमएसचे सहभागी आहेत. आययुएमएस नियतकालिके व बातमीपत्र प्रसिद्ध करते तसेच मूलभूत आणि उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र व जीवाणूशास्त्र यामधील उत्कृष्ट कार्याबद्दल संशोधकांना आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्रतिनिधींच्या महासभेत प्रदान करते. त्यात मूलभूत सूक्ष्मजीवशास्त्रासाठी स्टुअर्टमड हे परितोषिक, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रासाठी अरिमा परितोषिक आणि जीवाणू शास्त्रासाठी व्हाननील परितोषिक प्रदान करण्यात येते.
अनघा शिराळकर