१५-५-२०२५ | भारतातल्या हिऱ्यांचा इतिहास

भारतामधे सापडणाऱ्या हिऱ्यांना ४००० वर्षाहून अधिक जुना इतिहास आहे. कौटिल्यांचे अर्थशास्त्र आणि वराहमिहिरांची बृहत्संहिता यांसारख्या प्राचीन ग्रंथांमधे हिऱ्यांचा उल्लेख आहे. कोह-इ-नूर, ग्रेट मोगल, ऑरलॉफ, निजाम, दर्या-इ-नूर, होप, असे जगप्रसिद्ध हिरे आंध्र प्रदेशात कृष्णेच्या गाळामधे सापडलेले आहेत. अठराव्या शतकात ब्राझीलमधले हिऱ्यांचे साठे सापडले. तोपर्यंत भारत जगातला हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता.

ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांच्या खाणी दक्षिण भारतात आंध्र प्रदेशातल्या कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या काठी पसरलेल्या गाळांमधे होत्या. यातली कोल्लूर खाण ही सगळ्यात मोठी असून उत्कृष्ट प्रतीच्या हिऱ्यांकरता प्रसिद्ध आहे. पण गेली २००० वर्षे येथे खाणकाम सुरू असल्याने आता हिरे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हा भाग पूर्वी गोवळकोंडा संस्थानच्या अधिपत्याखाली येत असल्याने, आणि गोवळकोंडा हे हिऱ्यांच्या व्यापाराचे केंद्र असल्याने इथल्या खाणींना गोवळकोंडा खाणी असे नाव पडले आहे. इथले हिऱ्यांचे उत्पादन आता खूपच घटले असले, तरी कोह-इ-नूर, होप, असे जगप्रसिद्ध हिरे याच भागातून मिळाले आहेत.

इथल्या हिऱ्यांचा मूळ स्रोत असणारे किंबर्लाइट खडक आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातल्या वज्रकरूर गावाच्या परिसरात आढळतात. या पाषाणांची झीज होऊन त्यातले हिरे नंतर कर्नूल पाषाणसमूहाच्या अवसादी खडकांच्या काही प्रस्तरात आढळतात. तसेच पुढे कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या गाळांमधे मिळतात. या भागात हिरे सापडतात; हे जरी २००० वर्षांपूर्वीपासून माहिती असले, तरी किंबर्लाइटचा शोध मात्र भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातल्या भूवैज्ञानिकांना अगदी अलिकडे, १९८५ मधे लागला.

मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातल्या हिऱ्यांचा शोध त्या मानाने उशिरा, म्हणजे सतराव्या शतकात लागला.तिथे १६७५च्या आसपास हिऱ्यांचे उत्पादन सुरू झाले. इथे मझगवा नावाच्या गावाजवळ किंबर्लाइट नावाचा खडक आहे. तो इथल्या हिऱ्यांचा मूळ स्रोत आहे. याही किंबर्लाइटची झीज होऊन त्यातले हिरे विंध्यन पाषाणसंघाच्या काही प्रस्तरात मिळतात. मध्य प्रदेशातसुद्धा हिरे आढळतात हे आधी समजले, किंबर्लाइटचा शोध नंतर लागला. तो ब्रिटिश राजवटीत १८२७मधे कॅप्टन जेम्स फ्रॅंकलिन यांनी लावला.

अठराव्या शतकात जगात अन्यत्र हिऱ्यांच्या साठ्यांचा शोध लागल्यानंतर जागतिक बाजारपेठेतली भारतातल्या हिऱ्यांना असणारी मागणी कमी झाली. आजमितीस रशिया, बोट्स्वाना, काँगो, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे हिरे उत्पादनाच्या क्षेत्रात पाच अव्वल देश आहेत. हिऱ्यांच्या उत्पादनात या देशांचा वाटा ६०% पेक्षा जास्त आहे. आज भारत हा प्रमुख हिरे उत्पादक देश नाही, तरीही काही प्रमाणात खाणकाम चालू आहे.

डॉ. उदय कुलकर्णी