
नको असलेले जिवाणू, कवक (फंजाय), बीजाणू अथवा इतर सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे निर्जंतुकीकरण.एखादे द्रावण उकळून घेतले तरी त्यात जंतूंची वाढ का होते? इ.स.१८७० च्या सुमारास चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड या फ्रेंच तंत्रज्ञाने लुई पाश्चर यांच्या प्रयोगशाळेतच याचे कारण शोधायला सुरुवात केली. प्रयोगशाळेत द्रव निर्जंतुक करण्यासाठी ते बकपात्रात ठेवून १०० अंश सेल्शियस तपमानास उकळले जात असे. पण द्रव निर्जंतुक होत नसत. काही सूक्ष्मजीव,बीजपेशी त्या तपमानाला मरत नसत. चेंबरलँड यांचा असा होरा होता की सूक्ष्मजीव नष्ट होण्यासाठी १०० अंश सेल्शियस तपमान अपुरे ठरत असावे. तपमान १० ते २० अंशानी वाढवल्यावर मात्र सर्व जंतू व त्यांची बीजेदेखील नष्ट झाली. निर्जंतुकीकरणाचे तापमान १२१ अंश सेल्शियस निश्चित झाले.द्रव ज्या पात्रात निर्जंतुक केले जात त्या पात्रात जंतू असावेत, ही शक्यता लक्षात घेऊन चेंबरलँडने पात्रेही निर्जंतुक केली. अशातर्हेने पात्रे आणि द्रव दोन्ही निर्जंतुक करण्याची व्यवस्था चेंबरलँड यांनी केली. चेंबरलँड यांनी वाफेच्या उष्णतेचा वापर करून १२१ अंश सेल्शियस तापमानाला निर्जंतुकीकरणासाठी ‘ऑटोक्लेव’ हे उपकरण तयार केले. तसेच ‘हॉट एअरओव्हन’ उपकरणातून कोरड्या उष्णतेने (१४० ते १८० अंश सेल्शियस तापमान) निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत विकसित केली.
१८६७ साली जोसेफ लिस्टर यांना रोग्यांची सुश्रूषा करताना असे आढळले की, जवळपास ७०-८०% रोगी शल्यकर्म झाल्यानंतर होणार्या जंतूंच्या प्रादुर्भावाने दगावत आहेत. लिस्टर यांचे ठाम मत बनले की, शस्त्रागार आणि दवाखान्यांमधील दूषित हवेमुळेच जंतूचा प्रादुर्भाव होतो. जंतूंचा प्रवेश रोखला तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकारात शस्त्रक्रियेदरम्यान कॅर्बोलिक अम्लाने निर्जंतुक केलेले हातमोजे वापरणे, शस्त्रक्रियागृह कॅर्बोलिकआम्ल फवार्याद्वारे निर्जंतुक करणे, जखमांवरील पट्ट्या निर्जंतुक करून वापरणे, शस्त्रक्रियेची उपकरणे निर्जंतुक करणे, सर्व शल्यचिकित्सकांनी शस्त्रक्रियेपूर्वी ५% कॅर्बोलिक अम्लाने हात स्वच्छ धुऊन घेणे अशी आग्रही भूमिका घेतली आणि इथूनच त्यांच्या ‘निर्जंतुक शस्त्रक्रिया’ या संकल्पनेचा उदय झाला.
निर्जंतुकीकरणासाठी रेडिएशन ही प्रक्रिया देखील वापरली जाते ज्यात प्रामुख्याने क्ष किरणे गामा किरणे आणि अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा उपयोग केला जातो. मुख्यतः ही किरणे दोन प्रकारची असतात एक म्हणजे ‘आयोनायझिंग’, ज्याच्यामध्ये गॅमा किरण, एक्सरे आणि कॉस्मिक किरण यांचा समावेश होतो. ही किरणे सूक्ष्मजीवांमध्ये जाऊन त्यांचा डीएनए नष्ट करतात. आणि दुसरी म्हणजे ‘नॉन अयोनेझिंग,’ ज्यामध्ये अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा उपयोग केला जातो.
डॉ. रोहिणी कुळकर्णी