17-01-2025 | टॉमस ओल्डहॅम

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉंजीकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाची स्थापना १८५१ मधे झाली. त्याचे पहिले अधीक्षक म्हणून आयरिश भूवैज्ञानिक टॉमस ओल्डहॅम यांची नेमणूक करण्यात आली होती. १८५१ पासून ते १८७६ मधे निवृत्त होईपर्यन्त, म्हणजे २५ वर्षे, त्यांनी या विभागाची धुरा वाहिली.

त्यांचा जन्म १८१६ मधे डब्लिन येथे झाला. डब्लिनच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. १८३६ मधे पदवी मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते स्कॉटलंडमधे एडिंबरा विद्यापीठात गेले॰ अभियांत्रिकीचे स्नातकोत्तर शिक्षण घेताना भूविज्ञान या विषयाच्या तासांनाही मोठ्या आवडीने ते हजर राहू लागले. दोन वर्षे एडिंबरा येथे शिकून ते डब्लिनला परतले.

१८३८ मधे त्यांची नेमणूक ‘सेनासामग्री सर्वेक्षण’(ऑर्डनन्स सर्वे) खात्यात झाली. नेमून दिलेल्या क्षेत्राचे सैन्यदलासाठी भूरूपीय नकाशे (टोपोग्राफिकल मॅप्स) तयार करणे हे या खात्याचे काम होते. या खात्यात असताना त्यांनी आयरलॅंडच्या लंडनडेरी परगण्याचे सर्वेक्षण केले.

पुढे पाचच वर्षांनी त्यांना ‘डब्लिन भूवैज्ञानिक संघटना’ (जिऑलॉंजिकल सोसायटी ऑफ डब्लिन) या संस्थेचे ‘सचिव आणि संग्रहालय प्रमुख’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतर वर्षभरातच त्यांची नियुक्ती डब्लिनच्या ट्रिनिटी महाविद्यालयात भूविज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून झाली. शिवाय ‘आयरिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ या सरकारी विभागाचे ‘स्थानिक संचालक’ हे पद सांभाळण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली.

ओल्डहॅम यांनी केलेल्या विविध भूवैज्ञानिक सर्वेक्षणात त्यांना मिळालेल्या जीवाश्मांवर त्या काळातले ख्यातनाम जीवाश्मतज्ज्ञ एडवर्डज् फोर्बज् यांनी संशोधन केले. त्या जीवाश्मांमधे त्यांना एक नवी प्रजात मिळाली. ओल्डहॅम यांच्या गौरवार्थ त्या प्रजातीला त्यांनी ‘ओल्डहॅमिया’ असे नाव दिले.

याच काळात इकडे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा रेल्वे सुरू करण्याचा मनसुबा १८२० पासून सुरू होता. त्यासाठी आधी इथले दगडी कोळशाचे साठे शोधून काढणे गरजेचे होते. त्यासाठी कंपनी सरकारने काही भूवैज्ञानिकांची नेमणूक करून पाहिली. पण अपेक्षित यश मिळत नव्हते. मग ब्रिटिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण (ब्रिटिश जिऑलॉंजिकल सर्व्हे) या इंग्लंडमधल्या शासकीय विभागाप्रमाणे इथेही भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण हा विभाग स्थापन करायचे ठरले, तेव्हां या विभागाचे पहिले अधीक्षक म्हणून ओल्डहॅम यांची नियुक्ती करण्यात आली. भारतातल्या शिस्तबद्ध भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा पाया त्यांनी घातलाच, पण आपल्या विभागातर्फे केल्या जाणार्‍या संशोधनातील निष्कर्ष जगापुढे येण्यासाठी त्यांनी नवी भूवैज्ञानिक नियतकालिकेही सुरू केली.

निवृत्तीनंतर ते मायभूमीला परत गेले. पुढे दोनच वर्षांनी १८७८ मधे त्यांचे निधन झाले.

डॉ. विद्याधर बोरकर