
महाराष्ट्रामध्ये सुक्ष्मजीशास्त्रावरील संशोधन पुण्यात, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी अर्थात आजच्या आघारकर संशोधन संस्थेमध्ये सुरू झाले. १९४६ साली संस्थेचे संस्थापक आणि आद्यसंचालक, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी ही संस्था सुरू केली. पुढे केंद्र सरकारने ही संस्था डीएसटी (विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग) मध्ये समाविष्ट केली आणि स्वायत्त संस्था म्हणून आघारकर संशोधन संस्था असे नामकरण करण्यात आले.
१९५०च्या काळात, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रो. एन वी जोशी यांच्या दूरदृष्टीने सूक्ष्मजीवांवरचा अभ्यास व संशोधन यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९६५ मधे प्रो. पी एम वागळे मुंबईच्या हाफकिन संस्थेमधून सेवानिवृत्त होऊन महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीमधे रुजू झाले. त्यांच्या काळात पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेची प्रथमच सखोल चाचणी केली गेली.
१९७०नंतर खऱ्या अर्थाने सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि संशोधनाला सुरुवात झाली. ६० ते ८० च्या द्विदशकात जनुकशास्त्रज्ञ संचालक डॉ. गोविंद बाळकृष्ण देवडीकर यांनी गव्हाची अनेक रोगप्रतिकारक वाणं निर्माण केली. डॉ. श्रीधर गोडबोले त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठाचा सूक्ष्मजीवशास्त्रावरील पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे सुरु झाला. डॉ. अरविंद आगटे यांनी १९८१ मध्ये भूसूक्ष्मजीवशास्त्र अर्थात जिओमायक्रोबियॉलॉजी ही सूक्ष्मजीवशास्त्राची नवीन शाखा सुरु करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख अजूनच उंचावला. डॉक्टर आगटे यांनी विविध सुक्ष्मजीवांचा संग्रहदेखील चालू केला. हा संग्रह MCM (एमएसीएस कलेक्शन ऑफ मायक्रोऑर्ग्यानिझम्स) या नावाने आजही कार्यरत आहे. पुढे संचालक डॉ. किशोर पाकणीकर यांनी धातू आणि सूक्ष्मजीव यांचा एकमेकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू केला. पुढे त्यांनी नॅनो जैवतंत्रज्ञान शाखा संस्थेमध्ये सुरु केली. जखमेमधील जंतूंचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी चांदीचे नॅनोकण वापरून S-Gel नावाचे मलम तयार केले. सूक्ष्मजीवांचा वापर करून प्रदूषित जमीन आणि सांडपाणी कसे शुद्ध करता येईल, यावरती डॉ. प्रज्ञा काणेकर यांनी संशोधन केले. डॉ दिलीप रानडे यांनी खादी ग्रामोद्योग बायोगॅस प्रकल्पात मिथेन तयार करणार्या सूक्ष्मजीवांचा प्रामुख्याने अभ्यास केला. याच वर्षी संस्थेने सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने हायड्रोजन निर्मितीची प्रक्रिया विकसित केली आहे. संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जैवऊर्जाविभाग अनेक क्षेत्रात कार्यरत आहे, जसे की जैव-हैड्रोजन, जैव-मिथेन. वातावरणातील मिथेनचे शमन करणारे जीवाणू, ‘मेथेनॉट्रोफ्स’ त्यांची जैवविविधता आणि भातशेती, कचराभूमी व अन्य स्रोतामधून शमन यांवर डॉ. मोनाली रहाळकर यांचे संशोधन चालू आहे.
या संस्थेतून सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र, अशा अनेक विषयात विद्यार्थी पीएच.डी करू शकतात. संस्थेची वेबसाइट: https://aripune.res.in/
डॉ. मोनाली रहाळकर