नॅनोटेक्नॉलॉजी ही विलक्षण गतीने विस्तारीत होणारी विज्ञान व तंत्रज्ञानाला आकाश ठेंगणे वाटावे, अशी शाखा ठरू पाहत आहे. नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये १०० नॅनोमिटरपेक्षा अतिसूक्ष्म कण म्हणजे नॅनोपार्टीकल्सची निर्मिती, व्यवस्थापन व वापर यांचा अभ्यास केला जातो. नॅनोकण चार प्रकारात वर्गीकृत केले जातात. सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन मूल आणि संयुक्त. याचे तत्व असे आहे की कणांचा आकार जसजसा लहान होत जातो तसतसे त्यांचे विद्युत, प्रकाशीय, रासायनिक आणि यांत्रिक गुणधर्म बदलतात.
नॅनोपार्टीकल्सच्या निर्मितीसाठी हरित संश्लेषण पद्धत वापरली जाते. यात सूक्ष्मजीवांची वाढ करत असतांना त्यांचे पोषण माध्यम, सामू (पीएच), दाब, तापमान हे नियंत्रित करून धातूंच्या क्षारांपासून पर्यावरणपूरक, स्वच्छ, सुरक्षित, किफायतशीर व अत्यंत उत्पादक अशा नॅनोपार्टीकल्सची निर्मिती केली जाते. यात प्रामुख्याने बॅक्टेरिया, अॅक्टिनोबॅक्टेरिया, बुरशी, शैवाल आणि यीस्ट यांचा वापर केला जातो. तंतुमय बुरशी व यीस्ट अशा जीवांमध्ये, फ्युझेरियम ऑक्सिस्पोरम, अॅस्पर्जीलस प्रजाती, पेनिसीलियम प्रजाती, ट्रायकोडर्मा, कॅण्डिडा अलबिकान्स यांचा समावेश होतो. जीवाणू या वर्गात बॅसिलस लिचेनीफॉर्मिस, स्युडोमोनास डिसेप्शनसिस, स्युडोमोनास एरूजीनोसा, पायरोकोकस फ्युरीयोसस, पायरोब्याकुलम आयल्याडिकम, सायनोबॅक्टेरिया यांचा यशस्वीपणे वापर केला गेला आहे.
सूक्ष्मजीवांच्या सभोवती उपलब्ध असलेल्या धातूंच्या कणांना पकडून विकराद्वारे प्रक्रिया करून नॅनोपार्टीकल्सची निर्मिती करतात. सूक्ष्मजीवांपासून निर्मिती केलेले चांदी व सोन्याच्या नॅनोपार्टीकल्सचा उपयोग कृषी, कापड अभियांत्रिकी, सौंदर्यप्रसाधने, व आरोग्य क्षेत्रांत विविध प्रकारच्या धोकादायक जंतूविरुद्ध एक उत्कृष्ट शस्त्र म्हणून सिद्ध झाला आहे. तांबे, मॅग्नेशियम, जस्त, लोह, निकेल यांचेदेखील नॅनोपार्टीकल्स मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे
पर्यावरण, शेती, अन्न, जैवतंत्रज्ञान, जैववैद्यकीय, औषधे, ऑप्टोइलेट्रॉनिक्स, फोटोनिक्स, कॅटालिसिस, इमेजिंग तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये नॅनोपार्टीकल्सचे महत्वपूर्ण उपयोग आहेत. सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी, पर्यावरण देखरेख, प्रतिजैविकांचे मार्गदर्शक म्हणून, अर्बुद (ट्यूमर) लक्ष्यित म्हणून प्रभावी औषध वितरण, जैवक्रियाशीलता, जैवउपलब्धता, जैवसुसंगतता, कार्यात्मक अन्नमिश्रित पदार्थ म्हणून नॅनोपार्टीकल्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व शक्य झाले आहे ते त्यांच्या अतिसूक्ष्म आकार आणि प्रचंड पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार त्यांना प्राप्त होत असलेल्या विशिष्ट गुणधर्मांमुळे.
सूक्ष्मजीव धातूंच्या उच्च सांद्रतेमध्ये अनुकूलन करू शकतात आणि त्यांच्या बाह्यपेशी किंवा पेशीच्या आतल्या मार्गाद्वारे अजैविक पदार्थांना नॅनोपार्टीकल्स मध्ये रूपांतरित करण्याची त्यांच्यात क्षमता असते. नवनिर्मिती केलेल्या नॅनोपार्टीकल्सची गुणवैशिष्ट्ये निश्चित करण्यासाठी एक्स रे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीआणि फूरीयर ट्रान्सफॉर्म एन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला जातो.
डॉ सुहास कुलकर्णी