
२७ डिसेंबर १८२२ या दिवशी फ्रान्सच्या पूर्व भागातील दल या गावी लुई पाश्चरचा जन्म चामडी कमावणार्या एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणी मासे पकडण्यात आणि चित्रकलेत रमणारा लुई १८५४ साली लिले विद्यापीठात विज्ञान अधीक्षक म्हणून रुजू झाले.
सूक्ष्मजीवशास्त्रातील अनेक मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडले. जीवापासून जिवाची निर्मिती होते असे सांगणार्या ‘जीवजनन’ (बायोजेनेसिस) सिद्धांतावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. दारू, दूध यासारख्या द्रवपदार्थांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या ‘पाश्चराइझेशन’ प्रक्रियेला लुई पाश्चर यांचे नाव देण्यात आलं.
टार्टारिक अम्लाच्या स्फटिकांच्या रेणुतील रचनेचा त्यांनी अभ्यास केला. टारटारिक अम्लाच्या रेणूंमधील रचना प्रकाशाला उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे वळवते. टारटारिक आम्लाच्या रेणूंच्या आत विशिष्ट ‘असममित’ अंतर्गत व्यवस्था असते, जी प्रकाशाला वळवते, हे त्यांनी सिध्द केलं. यालाचा प्रकाशीय समावयवता (ऑप्टिकल आयासोमॅरिझम) असे म्हणतात.
सूक्ष्मजीवांमुळे रोग उद्भवतात, हा ‘जंतू सिद्धांत’ त्यांनी मांडला. १९व्या शतकात, सूक्ष्मजीवांना अर्धमेले, कमकुवत-क्षीण करून, त्यांनी लस तयार केली. नवीन लसींनी रोगांचा थेट सामना करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. कोंबड्यांना मारणारा चिकन कॉलरा (१८७९), मेंढ्यांना संपविणारा अँथ्रॅक्स (१८७९) आणि पिसाळलेलं कुत्रं चावून होणारा रेबीज (१८८२), या रोगांच्याविरुद्ध लसी विकसित करून, वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलं. ६ जुलै १८८५ रोजी, पाश्चरनं ९ वर्षांच्या जोसेफ मायस्टरवर, रेबीज लसीनं उपचार करून त्याला वाचविलं. त्यामुळे त्यांना विश्वात लोकप्रियता मिळाली. रोगप्रतिकारकशक्ती कशी कार्य करते, याचा त्यांनी शोध घेतला. सूक्ष्मजीवांमधील परिवर्तनशीलता ओळखून, सूक्ष्मजंतूंची रोगकारकता हा त्यांचा स्थिर नव्हे तर परिवर्तनशील गुणधर्म आहे; जो ते गमावू व परत मिळवू शकतात; जंतूंची रोगकारकता वाढली की साथ येते, असं प्रतिपादन त्यांनी केलं.
जैवविविधतेचा अभ्यास, रेशीमकिड्यांचा रोग दोन सूक्ष्मजीवांमुळं होतो, किण्वन प्रक्रिया, रोग हे जिवंत सूक्ष्मजीव आणि संप्रेरकांमुळं होतात, प्राणवायूविरहित वातावरणात काही सूक्ष्मजीव वाढतात; या आणि अशा अनेक निरीक्षणांचं श्रेय त्यांना जातं. सूक्ष्मजीवांच्या संवर्धनासाठी काचेच्या वस्तूंचा वापर त्यांनी सुरु केला. ते उत्तम निरीक्षक होते. त्यांनी आपली निरीक्षणं संकल्पनात्मक योजनांमध्ये राबविली.
१८५९ साली पॅरिसच्या सायन्स अकादमीतर्फे त्यांना २५०० फ्रँकचे ‘अल्हामपर्ट पारितोषिक’ जाहीर झाले. १८९५ साली सूक्ष्मजीवशास्त्रातील ‘ल्यूएनहॉक पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. ४ जून १८८७ रोजी, त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावानं, पॅरिसमध्ये पाश्चर संस्था सुरु करण्यात आली.
सूक्ष्मजीवशास्त्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे लुई पाश्चर यांना ‘आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचे पितामह’ मानले जाते.
डॉ. जया विकास कुऱ्हेकर