१८-११-२०२५ | जनुकीय परिवर्तित पिके

बीटी-कपाशी, बीटी-वांगं, बीटी-बटाटा, बीटी-टोमॅटो अशा बीटी पिकांची नावे शेतकऱ्याला परिचित आहेतच. सर्वसामान्य माणसांनाही माहिती आहेत. प्रत्येक पिकाच्या आधी बीटी शब्द जोडलाय. तो कशासाठी? पीक शेतात उभे राहिले की, त्याला खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे किडे, अळ्या आपोआपच तिकडे वळतात. ते त्यांच्यासाठी खाद्य असले तरी आपले नुकसान होते. पिकाचा उतारा कमी येतो. उदाहरणार्थ कपाशीच्या बोंडाला अळ्या कुरतडतात, खातात आणि त्यामुळे मिळणारा कापूस कमी आणि कमी प्रतीचा मिळतो. यावर उपाय म्हणून शेतकरी कीटक-विरोधी रासायनिक फवारणी करतो. कीटकांचा नाश करतो. पिकाचा कीटकांपासून बचाव होतो. उतारा चांगला पडतो.

कीटकनाशकांचे दुष्परिणामही आहेत. त्रासदायक कीटकांबरोबर उपयुक्त कीटकसुद्धा मरतात. अतिरिक्त कीटकनाशके वनस्पतीमध्ये शोषली जातात किंवा पावसाच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताला जाऊन मिळतात. दोन्ही बाजूंनी माणसाच्या आरोग्याला धोका. मग करायचं काय?

या बोंडअळी किंवा तत्सम अळ्यांना मारण्यासाठी निसर्गाकडे योजना आहे. बॅसिलस थुरिंजिएनसिस जीवाणू मातीमध्ये आढळतो. तो एक विषारी प्रथिन तयार करतो. हा जीवाणू किंवा नुसते प्रथिन जरी अळ्यांनी खाल्ले तरी अळ्या मरतात. निसर्गाची ही योजना म्हणजे काट्याने काटा काढणे. या योजनेचा आपण उपयोग केला तर! हे प्रथिन तयार करण्यासाठी जीवाणूमध्ये कोणते जनुक अस्तित्वात आहे याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतला. हे जनुक जर पिकांच्या पेशींमध्ये घुसवले, त्यातील गुणसूत्रांशी जोडून दिले तर पिकांच्या पेशीच विषारी प्रथिन तयार करतील. अशी बोंडे जर बोंड-अळ्यांनी खाल्ली तर त्या मरतील. आपले काम फत्ते होईल!

या प्रथिनाचे जनुक वनस्पतींमध्ये घुसवायचे कसे? मातीमध्ये अॅग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स नावाचा जिवाणू राहतो. त्याच्या पेशीत नेहमीच्या मोठ्या गुणसूत्राशिवाय छोटेसे वर्तुळाकार गुणसूत्र असते. त्याला प्लाझ्मिड म्हणतात. वनस्पतींच्या संपर्कात आल्यावर हे जीवाणू या प्लाझ्मिडमधील काही भाग वनस्पतींच्या पेशींमध्ये सोडतात. त्यातील जनुकांमुळे वनस्पती पेशींची अनिर्बंध वाढ होते. त्यांना क्राउन-गॉल रोग होतो. गाठी तयार होतात. हे निसर्गातील जेनेटिक इंजिनिअरिंग आहे. याचा शास्त्रज्ञांनी मोठ्या खुबीने उपयोग केला. प्लाझ्मिडमधील क्राउन-गॉल रोग तयार करणारी जनुके काढून टाकून त्या ठिकाणी बॅसिलस थुरिंजिएनसिस (बीटी) जीवाणूमधील प्रथिनांची जनुके जोडली. हा नवीन तयार केलेला जीवाणू प्रयोगशाळेत या वनस्पतीपेशींच्या संपर्कात आल्यावर त्याने आपले काम चोख बजावले. या जनुकाला वनस्पतीपेशीच्या गुणसूत्रांशी जोडून टाकले. या पेशींपासून तयार झालेली वनस्पती नवीन गुणधर्म धारण करून तयार झाली. हीच ती बीटी पीके!

बिपीन भालचंद्र देशमाने