वेस जॅक्सन यांनी ‘शाश्वत शेती’ हा शब्द पहिल्यांदा १९७८ साली वापरला आणि कृषी मंडळाच्या पर्यायी शेती या अभ्यासामुळे त्याला चालना मिळाली. यूएसडीए (यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर) ने वनस्पती आणि प्राणी उत्पादन पद्धतीची एकात्मिक प्रणाली म्हणून शाश्वत शेती ही संज्ञा परिभाषित केली. शाश्वत शेतीचे अनेक उद्देश आहेत. जसे की, मानवी अन्न आणि तंतुमय खाद्याच्या गरजा पूर्ण करणे, पर्यावरणीय गुणवत्ता आणि नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असलेली कृषी अर्थव्यवस्था वाढवणे, अपारंपरिक संसाधनाचा आणि शेतीवरील संसाधनाचा सर्वात कार्यक्षम वापर करणे आणि नैसर्गिक जैविक चक्रे आणि नियंत्रणे एकत्रित करणे, शेतीच्या कामाची आर्थिक व्यवहार्यता टिकवून ठेवणे व शेतकरी आणि संपूर्ण समाजाचे जीवनमान उंचावणे. शाश्वत शेतीचे अनेक घटक आहेत उदाहरणर्थ पीक फिरवणे, सेंद्रिय शेती, एकात्मिक कीड व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, जैवविविधता, पर्माकल्चर, कृषी वनिकरण, इत्यादी.
श्री. आर. एल. नारायणराव यांनी २००३ साली हैद्राबाद येथे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ‘सौभाग्य बायोटेक’ या कंपनीची मुहूर्तमेढ रचली. सुरुवातीला वनस्पती वाढीसाठीचे सिरीयल प्रोटीन हायड्रोलायसेट हे व्यावसायिकरित्या विकण्याकरिता सुरु केलेली कपंनी नंतर शेतीसाठी लागणाऱ्या बऱ्याच सेंद्रिय उत्पादनासाठी अग्रेसर ठरली. ही कंपनी, प्रयोगशाळेत निर्माण होणारे तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी कंपनी अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली. कालांतराने या कंपनीला, भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वैज्ञानिक व औद्योगिक परिषदेची मान्यता प्राप्त झाली.कंपनीने जीवाणूंचा वापर करून तयार केलेली दर्जेदार खते व सबंधित उत्पादने यामुळे भारतीय शेती उद्योगास चांगलीच चालना मिळून शेती उत्पादने अनेकपटींनी वाढली.
सध्या कंपनीची भुवनगिरी व मेडक येथे शेती उत्पादन करणारी मोठी युनिट्स आहेत. सौभाग्य बायोटेक कंपनीच्या दिल्ली, जम्मू, जोधपूर, लखनौ, भोपाळ, म्हैसूर बेंगलोर, कोईमतूर अशा भारतातल्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. भारतातील नावाजलेल्या शेतीसंबधित उत्पादन करणाऱ्या कंपन्या व असंख्य संशोधन आणि विकास प्रयोगशाळा यांच्याशी संधान साधून शेती व्यवसायाचा चेहरा मोहराच बदलून टाकण्यात या कंपनीने फार मोलाची भूमिका बजावली आहे.
सौभाग्य बायोटेक कंपनीला आंध्र प्रदेश राज्याचा प्रथम सर्वोत्तम उद्योजक पुरस्कार, फेडरेशन ऑफ एपी चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कडून एक्सलन्स इन ऑल राउंड परफॉर्मन्स अवॉर्ड, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट अवॉर्ड तसेच भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाकडून उत्कृष्ट उद्योजकतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.ही कंपनी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि पर्यावरण पूरक पद्धतीद्वारे कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे.
डॉ. सुहास कुलकर्णी