१८-०८-२०२५ | एड्सवर जनुकोपचार शक्य!

जून १९८१पर्यंत जगात एड्स रोगाबद्दल, एचआयव्ही रोगकारकाबद्दल माहीत नव्हते. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये मानवी रोगप्रतिक्षमता दुबळी करणाऱ्या नव्या रोगाविषयी प्रथम कळले. नव्या रोगाचे रुग्ण ‘कापोसी’च्या कर्करोगाने मोठ्या प्रमाणात मरू लागले. ‘कापोसी’ बळींची संख्या १९८१अखेर ३३७ झाली. रोगनिदान होऊन औषधोपचार करण्याआधीच न्यूमोनियासारख्या रोगांनी, केवळ सहा महिन्यात यापैकी १३० लोक मेले.

फ्रान्समधील ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’च्या फ्रान्स्वासिनूसी आणि ल्यूक मॉन्तानिये यांनी एचआयव्ही या एड्सकारक आरएनए विषाणूचा शोध १९८३ मध्ये लावला. त्यांना या संशोधनाबद्दल २००८चा शरीरक्रिया व वैद्यकक्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. १९८४ मध्ये ‘रॉबर्ट गॅलो’नी नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेरिलंडमध्ये मोठ्या प्रमाणात एचआयव्ही-1चे नमुने जमवले. टी-पेशी प्रयोगशाळेत एचआयव्ही-1च्या प्रती बनवण्याची व्यवस्था लावली.

पुढे हॉवर्ड टेमिन, डेव्हिड बाल्टिमोर यांच्या संशोधनामुळे हा एचआयव्ही ‘विरुद्धप्रतिलेखनाने’ (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज) स्वतःच्या प्रती बनवतो असे समजले. विरुद्धप्रतिलेखन म्हणजे सामान्यतः  डीएनए केंद्रकाम्लधारी जीव हे डीएनएपासून आरएनए आणि आरएनएपासून प्रथिने बनवतात. याउलट एचआयव्ही हा ‘रेट्रो’ कुटुंबातील विषाणू मात्र आरएनए केंद्रकाम्लधारी असून विपरीत पद्धतीने रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या विकरामार्फत आरएनएपासून डीएनए बनवतो. एकदा ही या विषाणूची कार्यप्रणाली समजल्यावर त्याला निकामी बनवता येते.

एचआयव्ही विषाणू आपल्या शरीरातील विशिष्ट ‘पांढऱ्या पेशींत’, ’टी-पेशी’त शिरून त्या मारतो. त्यांचे रक्तातील प्रमाण घटवून रोगप्रतिक्षमता कमकुवत करतो. परिणामी क्षयासारख्या रोगांना आपण बळी पडू शकतो. एड्स रोगावरील आधुनिक उपचारांत एकापेक्षा जास्त औषधे एकाच रुग्णस्नेही ‘कॉकटेल’ गोळीतून दिवसातून एकदाच रुग्णाला दिली जातात. ती विषाणूप्रभाव कमी करतात. एचआयव्ही विषाणू पेशीपटलाला चिकटू नये, चिकटलाच तरी पेशीपटलातून आत शिरू नये आणि  प्रवेशलाच तरी विषाणूने आरएनएपासून डीएनए बनूवू नये; जेणेकरून एचआयव्ही विषाणूसंख्या आणि एचआयव्ही विषाणू घनता कमी राखली जावी, अशाप्रकारचे प्रयत्न सध्या चालू आहेत.

आधुनिक रोगोपचार पद्धतीत जनुकोपचार शक्य झाला आहे. विषाणू हा त्याच्या  पृष्ठभागवरील प्रथिने (स्पाईक प्रोटीन्स) वापरुन, पांढर्‍या पेशीच्या पृष्ठभागावरील सीडी-4 ग्राहकाद्वारे (रिसेप्टर) आणि सीसीआर-5 व सीएक्ससीआर-4 या सहग्राहकाद्वारे (को-रिसेप्टर) पांढर्‍या पेशीत (यजमान) प्रवेश मिळवतात. म्हणून जनुकशास्त्रज्ञांनी सीसीआर-5 ला अवरोधक निर्माण केला. जेणेकरून विषाणू पांढर्‍या पेशीत प्रवेश करू शकणार नाहीत. ‘माराव्हिरॉक’ हे रसायन सध्या विषाणू अवरोधक म्हणून वापरले जाते. सीसीआर-5 हे जनुक कार्यरत नसलेल्या व्यक्तींना एड्स या रोगापासून नैसर्गिक संरक्षण मिळते.

नारायण वाडदेकर