पुस्तकांची लायब्ररी असते, पण डीएनएची लायब्ररी! हा काय प्रकार आहे ?
पेशींमध्ये केंद्रक असतो. केंद्रकात गुणसूत्रे असतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएच्या लांबच लांब धाग्यांनी बनलेले असते. डीएनए अॅडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन आणि थायमाईन या चार न्यूक्लिओटाइडना असंख्य वेळा आलटून पालटून जोडून बनलेला असतो. हे चार न्यूक्लिओटाइड्स म्हणजे सजीवाच्या जीवनग्रंथाची मूळाक्षरे! या मूळाक्षरांचा अनुक्रम म्हणजेच डीएनएत साठवलेली माहिती! माणसाच्या संपूर्ण डीएनए, जिनोममध्ये जवळजवळ तीन अब्ज न्यूक्लिओटाइटड असतात. एवढ्या मोठ्या जिनोम कुंडलीच्या महाप्रचंड मोठ्या ग्रंथाचे वाचन किंवा अभ्यास करायचा झाला तर महाकर्मकठीण! त्यासाठी डीएनएचे तुकडे करून त्या छोट्या छोट्या तुकड्यांचा अभ्यास करणे इष्ट आणि सोपे पडते!
डीएनएचे हे छोटे तुकडे ई.कोलाय सारख्या जीवाणूच्या छोट्या गुणसूत्राला (प्लाझ्मिड) जोडून द्यायचे! एकेका इ.कोलायमध्ये एकेक तुकडा! झाली आपली डीएनए ची लायब्ररी तयार! ज्या तुकड्याचा अभ्यास करायचा आहे तो इ.कोलाय घ्यायचा, प्रयोगशाळेत वाढवायचा, तो तुकडा मिळवायचा आणि त्याचे वाचन करायचे! माणसाच्या पेशीतील सर्व डीएनए छोट्या छोट्या तुकड्यांच्या रूपाने अनेक इ.कोलाय मध्ये विखुरला जातो. छोटा तुकडा म्हणजे जिनोमच्या महाविराट ग्रंथाचे एक पान किंवा छोटी पुस्तिका!
माणसाच्या किंवा सजीवाच्या पेशीतून डीएनए वेगळा करतात. त्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेज नावाच्या एन्झायमच्या सानिध्यात ठेवतात. हे विकर डीएनएला काही विशिष्ट ठिकाणी कापते. ही डीएनएला कापणारी कात्रीच आहे! डीएनएचे झालेले तुकडे वेगळे करतात. त्याच वेळी वर्तुळाकार प्लाझ्मिड फक्त एका ठिकाणी कापला जाईल हे पाहतात. त्यासाठी तेच विकर वापरतात. डीएनएचे तुकडे आणि सरळ झालेला प्लाझ्मिड यांना एकत्र आणतात. हे दोन डीएनएचे तुकडे जोडण्यासाठी लिगेज नावाचे विकर वापरतात आणि पुन्हा वर्तुळाकार प्लाझ्मिड बनतो. कापा, जोडा आणि चिकटवा अशा पद्धतीने हा नवीन डीएनए तयार होतो. हा नाविन्यपूर्ण प्लाज्मिड ई.कोलाय जीवाणूमध्ये घुसवतात! या जनुकीय अभियांत्रिकी प्रक्रियेला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. अशाप्रकारे मानवी पेशीचा संपूर्ण डीएनए छोट्या छोट्या तुकड्यांच्या रूपाने वेगवेगळ्या ई.कोलाय मध्ये विराजमान होतो! झाली डीएनएची लायब्ररी तयार!
हयूमन जिनोम प्रोजेक्टमध्ये प्रत्येक लांबलचक रंगसूत्राचे असेच छोटे छोटे तुकडे करून ई.कोलाय पेशींमध्ये क्रमाने जतन करून त्याचे वचन केले गेले. याद्वारे नवीन जनुकांचा शोध, जनुके नियंत्रित करणाऱ्या जनुकांचा शोध घेता येतो किंवा अप्रकट जनुकांचा देखील शोध घेता येतो.
बिपीन भालचंद्र देशमाने