१९-१२-२०२५ | प्रकाशीयदृष्ट्या धूलिकणविरहित हवा

वेस जॉन टिंडाल हे एक गणिती आणि भौतिकशास्त्राचे अभ्यासक होते. १८६९ साली प्रकाशावर काम करताना हवा ‘धुलिकणविरहित’ कशी करता येईल, याचा विचार ते करत होते. यासाठी टिंडाल यांनी एक पेटी बनवली. हिलाच कालांतराने ‘टिंडाल पेटी’ असे संबोधले गेले.! या बंद पेटीच्या आतील भिंतींना काळा रंग देऊन त्यांना ग्लिसरीनचा लेप दिला. प्रकाशाचा मार्ग पाहण्यासाठी समोरची काच मात्र पारदर्शक ठेवली.

प्रकाशशलाका धुलिकणांमधून जातांना प्रकाशकिरण विखुरतात आणि म्हणून आपल्याला त्या शलाकेचा मार्ग दिसतो. टिंडाल यांनी पेटीच्या एका बाजूने प्रकाशकिरण सोडले असता, प्रकाशशलाका दिसली नाही. टिंडाल यांनी तयार केलेल्या पेटीतले धुळीचे कण ग्लिसरीनला चिकटल्यामुळे पेटीत तरंगणारे धुळीचे कण उरलेच नाहीत. पेटीत धुलिकण नव्हते, हे सिद्ध झाले. टिंडाल यांनी पेटीतल्या हवेला ‘ऑप्टिकली एम्टी एअर’ म्हणजेच ‘प्रकाशीयदृष्ट्या धूलिकणरहित हवा’ असे संबोधले.

त्याकाळी डॉक्टरांना माहीत होते की, हवेतील घाण, धूळ आणि सूक्ष्मजंतूंमुळे विविध रोग पसरतात. या आधारावर टिंडाल यांनी असे गृहितक मांडले की, हवा शुद्ध केली तर त्यातून रोगजंतूंचे वहन होणार नाही. १८७० साली त्यांनी ‘प्रकाशीयदृष्ट्या धूलिकणरहित हवा’ हा आपला सिद्धांत लोकांपुढे मांडला. अशा हवेत सूक्ष्मजंतू असण्याची शक्यता खूपच कमी! टिंडाल पेटीचा वापर करून त्यांनी वाळलेल्या गवतातील जीवाणूंची बीजे नष्ट करून दाखवली.

जे अन्नपदार्थ१०० अंश सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त तापवता येत नाहीत किंवा तापवले तरीही खराब होतात, असे पदार्थ (उदाहरणार्थ दूध) निर्जंतुक करण्यासाठी त्यांनी एक पद्धती विकसित केली. त्यालाच ‘टिंडलायझेशन’ म्हणून ओळखले जाते.

टिंडलायझेशन प्रक्रियेत पदार्थ १०० अंश सेल्सिअसपर्यंत अंदाजे १५ मिनिटे तापवतात, त्यामुळे बहुतेक जंतू नष्ट होतात. मग त्याला ३७ अंश सेल्सिअसपर्यंत थंड होऊ देतात. काही जंतूंची बीजे ही उच्च तापमानाला सुप्तावस्थेत असतात आणि थंड केल्यावर पुन्हा प्रजनन अवस्थेत येतात. त्यामुळे हे  जंतू पुन्हा सक्रिय होऊ लागतात. आता पुन्हा अन्नपदार्थाला तापवतात. अशा रीतीने तिन फेऱ्यांमध्ये ‘तापवणे–थंड करणे’ केले जाते. असे केल्याने अन्नपदार्थ निर्जंतुक होतो. ही पद्धत पाश्चरायझेशनपेक्षा वेगळी असून, विशेषतः बीजाणू निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी प्रभावी मानली जाते.

१८५३ मध्ये रॉयल पदक व १८६४ मध्ये रुम्फोर्ड पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. जॉन टिंडाल यांचा वयाच्या ७३व्या वर्षी ४ डिसेंबर १८९३ हसलेमेर सरे, इंग्लंड येथे मृत्यू झाला.

डॉ. जया विकास कुऱ्हेकर