१९-५-२०२५ | अभ्रक कुळातली खनिजे

ज्या निरनिराळ्या खनिजांमधे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन), रेण्वीय रचना (मोलेक्युलर स्ट्रक्चर) आणि गुणधर्म यांमधे उल्लेखनीय साधर्म्य असते, अशा खनिजांच्या गटाला ‘खनिजांचे कुळ’ (मिनरल फॅमिली) असे म्हणतात. खनिजांच्या अशा कुळांपैकी बऱ्याच जणांना माहिती असणारे, आणि मानवासाठी उपयुक्त असणारे कुळ म्हणजे अभ्रक कुळ. अभ्रक कुळातली खनिजे रासायनिक दृष्टीने सिलिकेट वर्गात येतात.

सिलिकेट प्रकारच्या खनिजांमधेही त्यांच्या रेण्वीय रचनेप्रमाणे काही उपप्रकार आहेत. त्यापैकी पत्रीसिलिकेट (फायलोसिलिकेट) उपप्रकारात अभ्रक कुळातल्या खनिजांचा समावेश होतो. याचे कारण म्हणजे अभ्रकाचा एखादा मोठा तुकडा जर आपण घेतला, तर तो अनेक पापुद्ऱ्यांचा मिळून बनला आहे असे आपल्या लक्षात येईल. त्यातले पापुद्रे आपल्याला सहजपणे वेगळे करता येतात. ते पारदर्शक आणि लवचिक असतात.

अभ्रक कुळात निरनिराळी ३७ खनिजे आहेत, पण त्यातली काही खनिजेच सर्वत्र आढळतात. या कुळातली खनिजे रंगांवरून दोन गटात विभागली जातात; फिकट रंगाची आणि गडद रंगाची. फिकट रंगांच्या अभ्रक खनिजांमधे प्रामुख्याने मस्कोव्हाइट, फ्लोगोपाइट आणि पॅरॅगोनाइट यांचा समावेश होतो, तर गडद रंगांच्या खनिजांमधे प्रामुख्याने काळ्या रंगाचे बायोटाइट, हिरव्या रंगाचे फुशाइट, जांभळ्या रंगाचे लेपिडोलाइट यांचा समावेश होतो.

अभ्रक विद्युत्-रोधक आणि उष्णता-रोधक आहे. शिवाय अभ्रकाला चमकही असते. याच गुणधर्मांमुळे अभ्रकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. इस्त्री, धुलाई यंत्र, विजेची शेगडी अशा अनेक प्रकारच्या विजेच्या घरगुती उपकरणांमधे अभ्रकाचा वापर केला जातो. याखेरीज काही सौन्दर्य प्रसाधने आणि शोभेच्या वस्तू यांच्या उत्पादनांमधे अभ्रक वापरले जाते.

अभ्रक निसर्गामधे विपुल प्रमाणात आढळते. ते अग्निजन्य (इग्निअस), अवसादी (सेडिमेंटरी) आणि रूपांतरित (मेटॅमॉर्फिक) अशा तिन्ही प्रकारच्या खडकांमधे असू शकते. प्रत्येक ठिकाणी सापडणारे अभ्रक हे औद्योगिक दृष्टीने उपयुक्त असेलच असे नाही. कारण बऱ्याच खडकांमधे, आणि विशेषतः अवसादी खडकांमधे, अभ्रक खनिजे छोट्या, पातळ तुकड्यांच्या स्वरूपात असतात. पण जेव्हां खडकांमधे जाड आणि मोठे स्फटिक विकसित झालेले असतात, तेव्हां पाहिजे त्या आकारात आणि पाहिजे त्याच जाडीचे अभ्रकाचे तक्ते कापता येतात. भारतात औद्योगिक उपयोगाच्या अभ्रकाचे भरपूर साठे असून ते आंध्र प्रदेश, तेलंगण, झारखंड, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यात आहेत.

आयुर्वेद असे मानते, की मधुमेह, श्वास, कुष्ठ, कास, शोथ, पण्डुरोग, हृदयरोग अशा काही व्याधी बऱ्या करण्यासाठी कृष्णअभ्रक उपयुक्त आहे.

प्रा. सुधाकर पंडित