20-01-2025 | भूजल आणि हवामानबदल

भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे. वराहमिहिरांनी बृहत्संहितेत पाण्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. त्यात ढगांचे, पर्जन्यवृष्टीचे, भूपृष्ठावर साठणारे आणि जमिनीत जिरणारे पाणी यांचे संदर्भ विस्ताराने येतात. जमिनीवरील पाणी जमिनीखाली झिरपून खडकांमधील भेगांमधून प्रवाहित होते, आणि सच्छिद्र खडकांमधे ते साठून रहाते.

अलिकडच्या काळात हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे परवलीचे शब्द झाले आहेत. पृथ्वीचे तापमान नैसर्गिक कारणांमुळेदेखील वाढत असले, तरी सध्याची तापमानवाढ आणि हवामान बदल हे मुख्यत: मानवननिर्मित आहेत. मानवी क्रियाकलापांमुळे कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण हवेत वाढले की हरितगृह परिणाम अस्तित्वात येऊन त्याच्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढण्याचा संभव असतो. याचाच परिणाम होऊन हवामान बदल घडून येतो. २०२४ चा भयानक उन्हाळा, किंवा २०२३ मधे एकीकडे अवर्षण तर दुसरीकडे पुण्यासारख्या ठिकाणी कमी वेळात भरपूर पाउस पडल्याने उद्भवलेली परिस्थिती, ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. पावसाच्या आगमनाच्या आणि पडण्याच्या स्थितीत झालेला बदल देखील काही वर्षांपासून अनुभवास येतो आहे. या सर्व बदलांचा थेट परिणाम पाण्याचे साठे आणि भूजलावर होत असतो.

जेव्हां भूपृष्ठावरील उपलब्ध पाणीसाठा कमी पडतो, आणि त्याच्या वापराचे नियोजन बिघडते, तेव्हां भूजलावर अवलंबून रहावे लागते. गेल्या काही वर्षात भूजलाचा वापर बेसुमार वाढला आहे. ते विहीरींच्या अथवा कूपनलिकांच्या द्वारे वापरले जाते. जोपर्यंत भूजलाचे पुनर्भरण होत रहाते, तोपर्यंत भूजलसाठा वापरात आणायला काही प्रत्यवाय नसतो. पण जेव्हां पावसाचे प्रमाण, पाउस पडण्याची पद्धत, मातीचा प्रकार, तिच्यावरील आच्छादन, जमिनीचा उतार, हे आणि यांसारखे इतर घटक प्रभावित होतात; तेव्हां भूजलाच्या पुनर्भरणावर मर्यादा येतात. नुसताच उपसा सुरू राहिल्याने भूजलाची पातळी आणि गुणवत्ता दोन्ही खालावत जातात.

खडकांचे गुणधर्म. पाणी साठवणक्षमता, मातीचा प्रकार, तापमान, वार्‍याचा वेग, जमिनीचा उतार, जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन. पावसाचे प्रमाण आणि स्वरूप, अशा अनेक गोष्टींचा भूजलसाठ्यावर परिणाम होत असतो. पावसाचे पाणी हे रंगरहित आणि चवरहित असते. पण जमिनीत झिरपल्यानंतर खडक व मातीच्या प्रकारानुसार पाण्याची क्षारता व चव बदलत जाते.

सध्याच्या काळातील पाणीटंचाई आणि लहरी हवामानामुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण आणि काटकसरीने वापर हे कळीचे मुद्दे बनले आहेत.

डॉ. योगिता पाटील