२०-११-२०२५ | रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र, अमेरिका

अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधी जागृती  १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिवतापाला (मलेरिया) प्रतिबंध घालण्यासाठी यू.एस. पब्लिक हेल्थ सर्व्हिसने मलेरिया कंट्रोल इन वॉर एरियाज प्रोग्राम म्हणून सुरुवातीला रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राची स्थापना केली. याला ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) असे म्हणतात, या केंद्राचे मध्यवर्ती कार्यालय अॅटलांटा, जॉर्जिय येथे आहे. हेच केंद्र भविष्यात  राष्ट्रीय आणि जागतिक शक्ती बनली. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट रोग, इजा (दुखापत) आणि अपंगत्व यांच्या नियंत्रणाद्वारे अमेरिकेतील आणि जगातील लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपणे हे आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या गरजा ओळखणे, साथीच्या आजारांशी संबंधित धोक्यांना प्रतिसाद देणे तसेच आपत्ती आणि युद्धजन्य परिणामांसाठी सीडीसी कौशल्यपूर्ण कार्य करते. विविध रोगांचे आणि आरोग्यसमस्यांचे निरीक्षण, त्यांचे निदान आणि नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे, साथीच्या रोगांचा उद्रेक झाल्यास जलद प्रतिसाद देऊन परिस्थिती नियंत्रणात आणणे, लोकांना आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी माहिती आणि शिक्षण देणे, सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी प्रशिक्षण देऊन कौशल्य वाढविणे, लस आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांमुळे होणारे रोग कमी करणे इत्यादी अनेक कार्ये ही संस्था करते.

संसर्गजन्य आणि साथीचे रोग नियंत्रणात आणण्यास सीडीसीच्या कामामुळे अमेरिका आणि जगातील लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता सुधारण्यास मदत झाली आहे. सीडीसीच्या अंदाजानुसार दरवर्षी ६ पैकी १ अमेरिकन (किंवा ४८ दशलक्ष लोक) आजारी पडतात तर १,२८,००० रुग्णालयात दाखल होतात. सीडीसीचे काम अनेक केंद्रे, संस्था आणि कार्यालयाच्या माध्यमातून चालते. २०२३ च्या पुनर्रचनेनुसार मुख्यत्वेकरून राष्ट्रीय लसीकरण आणि श्वसनरोग केंद्र, राष्ट्रीय उदयोन्मुख आणि झुनोटिक संसर्गजन्य रोग केंद्र, जागतिक स्थलांतर आरोग्य विभाग, राष्ट्रीय एचआयव्ही/एड्स, व्हायरल हेपेटायटीस, लैंगिक रोग आणि टीबी प्रतिबंध केंद्र, जन्मदोष आणि विकासात्मक अपंगत्वावरील राष्ट्रीय केंद्र इत्यादी विभाग कार्यरत आहेत. सीडीसीच्या उपक्रमांनी देवीच्या रोगाचे निर्मूलन, पोलिओ आणि नारूच्या रोगांचे नियंत्रण, तसेच एड्स (एचआयव्ही), बालपणातील शिशाची विषबाधा, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, मधुमेह, हिंसाचार यासारख्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महामारी, सार्वजनिक आरोग्याची देखरेख, जोखमीचे घटक कमी करणे आणि पर्यावरणीय जोखमीचे मूल्यांकन यामध्ये सीडीसीचे योगदान जगभरातील सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण राहिले आहे.

डॉ. गजानन माळी