२०-०८-२०२५ | प्रतिजैविके जेव्हा निष्प्रभ ठरतात!

प्रतिजैविके, नैसर्गिक कार्बनी संयुगे असतात. जीवाणू आणि कवके त्यांच्या चयपचाय क्रियेद्वारा निर्माण झालेले ते उत्सर्जित पदार्थ असतात. ती निर्माण करून सूक्ष्मजीव अन्य प्रकारच्या सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. मातीमध्ये जगण्यासाठीचा हा संघर्ष सतत चालू असतो. जगण्यासाठीचे घटक सजीवांना संघर्षाविना मिळत नाहीत. काही सूक्ष्मजीव प्रतिजैविके निर्मितात, स्वतःबाहेर टाकून प्रतिस्पर्धी मारतात. प्रतिस्पर्ध्यांची संख्या घटल्यावर प्रतिजैविके बनवणार्‍यांना स्वतःसाठी जास्त संसाधने मिळतात. रोगकारक सूक्ष्मजीव मारणारी प्रतिजैविके, रोगनियंत्रणास उपयोगी पडतील हे माणसाना समजले. त्यातून प्रतिजैविके बनवण्याचा मोठा उद्योग उभा राहिला.

अलेक्झांडर फ्लेमिंगना पेनिसिलीन, या प्रतिजैविकाचा शोध १९२८ मध्ये लागला. पेनिसिलीनच्या चाचण्या झाल्या. आधी प्रयोगशाळेत लहान प्रमाणात पेनिसिलीन बनवले गेले. नंतर कारखान्यांत मोठ्या प्रमाणात जगभरच्या माणसांसाठी रोगोपचार म्हणून बनवले गेले. रोग्यांना उपचारासाठी पेनिसिलीनच्या गोळ्या, इंजेक्शने मिळायला १९४५ साल उजाडले. दुसऱ्या महायुद्धकाळात हजारो जखमी सैनिक पेनिसिलीनमुळे वाचले. तेव्हा जंतूसंक्रमित रोग्यांचा जीवही प्रतिजैविके वाचवतात हे कळले. पेनिसिलीन हे ‘अरुंद-स्पेक्ट्रम’ प्रतिजैविक आहे. म्हणजे फक्त ग्राम पॉझिटिव्ह रोगकारक जंतुंचा नायनाट करू शकते. उदा. स्टेफिलोकोकल संसर्ग.

डॉक्टर सेलमान वॉक्समन यांनी स्ट्रेप्टोमायसिन या प्रतीजैविकचा शोध लावला. हा क्षय रोगावरचा पहिला प्रभावी उपचार ठरला. हे ‘व्यापक-स्पेक्ट्रम’ प्रतिजैविक आहे. १९५२ साली त्यांना या शोधाबद्दल नोबेल परितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढील तीस-पस्तीस वर्षात टेट्रासायक्लीन, अझीथ्रोमायसीन, अमॉक्सिसिलीन, पॉलीमिक्झिन, बॅसिट्रॅसिन, क्लोरॅम्फेनिकॉल, रायफॅम्पीन, निओस्पोरीन अशा प्रतिजैविकांची निर्मिती, अभ्यास, वापर चालू झाला. प्रतिजैविके विविधप्रकारे प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करतात. पेनिसिलीन जीवाणूच्या पेशीभित्तिका नष्ट करते, सिफॅलोस्पोरीन, अझीथ्रोमायसिन, क्विनोलोन ही प्रतिजैविके सूक्ष्मजीवांच्या डीएनए, आरएनए आणि प्रथिन निर्मितीत अडथळे आणतात.

प्रतिजैविकांबाबत महत्वाचे म्हणजे डॉक्टरांनी रोग्याला दिलेली औषधाची मात्रा रोग्याने सूचित प्रमाणात व पूर्ण कलावधीसाठी घ्यावी. स्वतःहून औषध घेणे बंद करू नये किंवा एखाद्या संसर्गदोषासाठी रोग्याने स्वतःहून कुठलेच प्रतिजैविक घेऊ नये.

कालांतराने प्रतिजैविकांना रोगकारक जंतूंचा विरोध वाढतच जातो आणि याचा परिणाम असा होतो की, रोगजंतू देखील उत्परिवर्तित होतात आणि ती प्रतिजैविके निष्प्रभ ठरतात. क्षयाचा (टीबी) जीवाणू अनेकवेळा उत्परिवर्तित झाल्यामुळे या प्रतिजैविकांना न जुमानणारे एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी सारखे रुद्रावतार अस्तित्वात आले आहेत. या उत्परिवर्तित प्रजाती एकाचवेळी अनेक प्रतिजैविकांना विरोध करतात. मूत्राशयात जंतुसंसर्गदोष निर्माण करणारे जीवाणू नेमके कुठल्या प्रतिजैविकांना प्रतिसाद देतील याची चाचणी करूनच योग्य प्रतिजैविकाची निवड केली जाते.

नारायण वाडदेकर