अणुऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी १९४८ साली भारत सरकारने ‘अणुऊर्जा आयोगा’ची स्थापना केली. अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या उपयुक्त खनिजांचे अन्वेषण आणि विकास करणे हा त्यामागील एक प्रमुख उद्देश होता. त्यासाठी २९ जुलै १९४९ रोजी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया) या विभागाची दुर्मिळ खनिजे सर्वेक्षण शाखा (रेअर मिनरल्स सर्व्हे युनिट) अणुऊर्जा आयोगाच्या नियंत्रणाखाली आणली. त्या शाखेच्या प्रमुखपदी प्रख्यात भूवैज्ञानिक आणि भारत सरकारचे भूवैज्ञानिक सल्लागार डॉ. दाराशॉ नोशेरवान वाडिया यांची नियुक्ती करण्यात आली.
आता त्या शाखेला ‘परमाणु खनिज निदेशालय’ (ॲटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फ़ॉर एक्स्प्लोरेशन अँड रिसर्च, एएमडी) या नावाने ओळखले जाते. युरेनियम, थोरियम यांच्या खनिजांचे; आणि बेरिलियम, लिथियम, नायोबियम, टँटालम, झिरकोनियम, दुर्मिळ मृत्तिका (रेअर अर्थ्स), इत्यादि मूलद्रव्यांच्या खनिजांचे अन्वेषण (एक्स्प्लोरेशन), आणि विकास करण्याची जबाबदारी या निदेशालयाकडे आहे.
झारखंडच्या सिंहभूम पट्ट्यामधे ‘परमाणु खनिज निदेशालय’, ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ आणि दामोदर घाटी आयोग (दामोदर व्हॅली कार्पोरेशन) या तीन विभागांच्या संयुक्त चमूने युरेनियमचे अन्वेषण १९५० मधे सुरू केले. भारतातलया युरेनियमच्या साठ्याचा पहिला शोध याच पट्ट्यामधल्या जादुगोडा इथे १९५१ मधे लागला. त्यापाठोपाठ नरवापहाड आणि भाटीन येथील साठ्यांचा शोध लागला. हळूहळू अन्वेषणचे कार्यक्षेत्र देशभर पसरले.
सुरुवातीला सतरा भूवैज्ञानिक आणि सात तंत्रज्ञ असलेल्या परमाणु खनिज निदेशालयात आता ५०० वैज्ञानिक आणि जवळपास २,४०० कर्मचारी कार्यरत आहेत. निदेशालयाचे मुख्यालय हैदराबादला असून सात क्षेत्रीय विभाग आणि सहा विशिष्ट अन्वेषण गट यांच्यामार्फत खनिजांचे अन्वेषण केले जाते. याखेरीज परमाणु खनिज निदेशालयात भौतिकविज्ञान, रसायनविज्ञान, खनिजविज्ञान, शिलाविज्ञान, क्षकिरण विवर्तन (एक्सरे डिफ्रॅक्शन), भूकालानुक्रम (जिओक्रोनॉलॉंजी), स्थिर समस्थानिक (स्टेबल आयसोटोप), इलेक्ट्रॉन एषणी सूक्ष्म विश्लेषण (इलेक्ट्रॉन प्रोब मायक्रो अॅनॅलिसिस)) आणि खनिज प्रक्रमण (मिनरल प्रोसेसिंग) अशा अनेक अद्ययावत् आणि उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा आहेत.
२०२४ मधे परमाणु खनिज निदेशालयाने हीरक महोत्सव साजरा केला. या ७५ वर्षांमधे युरेनियमच्या लहानमोठ्या ४७ साठ्यांचा शोध लावला गेला. त्यातले बहुसंख्य आंध्र प्रदेश, झारखंड, मेघालय आणि राजस्थान या राज्यांमधे आहेत. त्यांपैकी आठ साठ्यांमधून युरेनियम ऑक्साईडचे उत्पादन केले जाते. शिवाय थोरियम, झिरकोनियम, इतर दुर्मिळ मूलद्रव्ये, यांच्याही खनिजांचे साठे शोधले आहेत. विशेष म्हणजे भारत हा थोरियमच्या बाबतीत खूप समृद्ध आहे.
भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमामधे परमाणु खनिज निदेशालयाचे खूप मोठे योगदान आहे.
अरविंद आवटी