२१-११-२०२५ | स्वतःलाच संसर्ग करून घेणारा अवलिया!

१९५१ साली पश्चिम ऑस्ट्रेलियातील कलगुर्ले या सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाळवंटी भागात बॅरी मार्शल यांचा जन्म झाला. १९७५ साली त्यांनी एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. १९७८ साली ते फिजिशियन बनले. १९८१ साली त्यांची गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी विभागात नेमणूक झाली. तिथे त्यांची रॉबिन वॉरेन यांची भेट झाली.

गॅस्ट्रिक आणि पेप्टिक अल्सर हा आजार हेलिकोबॅक्टर पायलोरी या सर्पिल आकाराच्या जीवाणूमुळे होत नाही, असे १९८१ साली एका अहवालात म्हटले होते.

१९८४ साल उजाडले. डॉक्टर मार्शलयांनी हेलिकोबॅक्टर पायलोरी जीवाणू प्राण्यात टोचून रोग आणि रोगजंतूंचा संबंध पडताळून पाहात होते; परंतु यासंबंधीचे त्यांचे काम आणि संशोधनपर लेख फेटाळले जाऊ लागले. त्यांनी काढलेले निष्कर्ष इतरांनी पडताळून बघितल्यावर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यांना असे सांगण्यात येई की, तुम्ही ज्या जीवाणूला म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरी याला रोगकारक म्हणता आहात, तो एक एकोप्याने आतड्यात वास्तव्य करणारा जीवाणू आहे. यामुळे ऊतीविच्छेदनात आढळणारा हा जीवाणू रोगकारक आहे हे सिद्ध करायचे कसे, हा डॉक्टर मार्शलपुढे फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान त्यांनी स्वतःवरच एक प्रयोग करून घेण्याचे धाडस केले होते. त्यांनी हेलिकोबॅक्टर पायलोरी या ऊतीविच्छेदनातून वेगळ्या केलेल्या जीवाणूचे द्रावण तयार केले आणि ते चक्क पिऊन टाकले. त्याचे परिणाम काय होतील आणि त्यांना त्यामुळे किती तीव्र आजारचा सामना करावा लागणार आहे, याबद्दल ते स्वतः उत्सुक होते. त्यांनी जेव्हा स्वतःच्याच पोटाचे ऊतीविच्छेदन करून पहिले तर त्यांना अल्सरचा तीव्र संसर्ग झालेला असल्याचे आढळून आले. त्यांनी आपला ऊतीविच्छेदन अहवाल त्यांची पत्नी अॅड्रिएनला दाखवला, तेव्हा ती जरा घाबरलीच आणि काळजीने म्हणाली की, ‘लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू कर’. आपल्याला हेलिकोबॅक्टर पायलोरीमुळे संसर्ग झाला असल्याचा डॉक्टर मार्शल यांना आनंद झाला होता. रोगाचे कारण सापडले होते. त्यांनी आपला मुद्दा सिद्ध केला होता. या बातमीने डॉक्टर बॅरी मार्शल एकदम प्रकाशात आले. या त्यांच्या संशोधनासाठी २००५ सालचे नोबेल परितोषिक देऊन बॅरी मार्शल आणि रॉबिन वॉरेन यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या डॉक्टर मार्शल पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये पर्थ येथे राहतात. पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठात अजून ते कार्यरत आहेत. २००५ साली त्यांनी ‘ऑन्डेक’ नावाची नवीन व्हॅक्सिन कंपनी स्थापन केली आहे.

डॉ. रंजन गर्गे