२१-४-२०२५ | जेव्हां संपूर्ण मृतदेहाचा जीवाश्म होतो

अतिप्राचीन सजीवांचे अवशेष खडकांच्या थरांमधे मिळतात. त्या अवशेषांना आपण जीवाश्म म्हणतो. जीवाश्मांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. भूवैज्ञानिकांना खडकांमधे प्राचीन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरातली सुटी हाडे, सांगाडे आणि दात सापडतात. किंवा अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरावरची कवचे सापडतात. अशा अवशेषांना कायिक जीवाश्म (बॉडी फॉसिल्स) म्हणतात. पण प्राण्यांच्या पावलांचे ठसे, त्यांनी बनवलेली बिळे, सागराच्या तळालगत सरपटत जाणाऱ्या प्राण्यांच्या सरकत जाण्यामुळे पडलेल्या चाकोऱ्या (ट्रेल्स), अशा प्राण्यांनी केलेल्या हालचालींचे अवशेष खडकांत आढळतात. या प्रकारच्या जीवाश्मांना लेशजीवावशेष (ट्रेस फॉसिल्स) किंवा पदचिन्ह जीवावाशेष (इक्नोफॉसिल्स) म्हणतात.

जीवाश्मांमधे सजीवांच्या शरीरातल्या मृदु ऊतींचे (सॉफ्ट टिशूज) जतन होणे अत्यंत दुरापास्त असते. कारण मृत्यूनंतर मृदु ऊती सडून जातात आणि नाश पावतात. पण निसर्गामधे अनेक विस्मयकारक गोष्टी घडू शकतात. त्यातली एक आपल्याला अति-उत्तरेकडे असणाऱ्या टंड्रा प्रदेशात पाहायला मिळते. या भागात तापमान शून्याच्या खालीच असते. उन्हाळ्यात क्वचित् कधीतरी ते शून्यापेक्षा थोडेसे  जास्त  असते.  इथली  जमीन  सदैव  गोठलेली  असते.  त्यामुळे  तिला ‘चिर-अतिशीत भूमी’ (पर्माफ्रॉस्ट) असेच म्हटले जाते.

सुमारे गेल्या तीस लाख वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर हिमयुग सुरू होते. तापमानात थोडा चढ उतार होत असला, तरी तापमान कमालीचे थंड होते. त्यामुळे पृथ्वीवर फार मोठ्या क्षेत्रावर बर्फ साठला होता. उत्तर ध्रुवाभोवतीच्या आर्क्टिक महासागरातले पाणी देखील गोठले होते. गेल्या आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी हे हिमयुग संपले.

त्या हिमयुगात हत्तीचा पूर्वज असणारा एक प्राणी होता. आपण त्याला केसाळ मॅमथ (वूली मॅमथ) या नावाने ओळखतो. बराचसा हत्तीसारखा दिसत असला, तरी त्याचे कान आणि शेपूट लहान होते. आणि अंगावर भरपूर लोकर होती. त्या लोकरीमुळे मॅमथचा थंडीपासून बचाव होत असे. सगळ्यात नवलाची गोष्ट अशी, की हे प्राणी अतिशीत प्रदेशात राहत असत. त्यामुळे त्यांचे मृतदेह जेव्हां मृत्यूनंतर लगेच तिथल्या मृदेखाली (सॉइल) गाडले गेले, तेव्हां त्यांच्या देहाचे फारसे विघटन झाले नाही. त्यामुळे मॅमथचे जे जीवाश्म सापडतात, त्यात सांगाड्याबरोबर त्यांचे रक्त, मांस, चामडे यांचेही जतन झाल्याचे आढळून येते. आफ्रिकेत आढळणाऱ्या हत्तींच्या लोक्जोडोन्टा या प्रजातीपेक्षा आशियातल्या एलेफस या प्रजातीशी मॅमथचे जास्त जवळिकीचे नाते आहे.

सायबेरियात हत्तींप्रमाणे इतरही काही सस्तन प्राण्यांचे जीवाश्म मृदु ऊतींसह सापडले आहेत.

डॉ. नंदिनी विनय देशमुख