२२-१२-२०२५ | इथेनॉलचे क्रांतिकारी उद्योग विश्व!

अलीकडे इंधनाच्या उपलब्धीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खनिजतेलाचे व कोळशाचे साठे ५०-६० वर्षात संपुष्टात येतील. आपण आताच ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधले नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्या अंधारात चाचपडतील. सध्या इंधन म्हणून वापरत असलेली पेट्रोरासायनिक खनिज तेले यांना भविष्यात पर्याय निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

माणसाला मद्यार्क निर्माण करण्याचे तंत्र अनादीकालापासून अवगत आहे. मद्यार्कात इथेनॉल हा मुख्य घटक असतो. शर्करामय पदार्थ, स्टार्चयुक्त धान्ये, कंदमुळे, फळेही इथेनॉल निर्मितीसाठी वापरतात. त्यात किण्वनासाठी यीस्ट वापरतात. शर्करेचे इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतर होते. ग्लुकोजच्या एका रेणूपासून दोन इथेनॉलचे रेणू व दोन कार्बन डायऑक्साइडचे रेणू तयार होतात. त्यानंतर, ऊर्ध्वपातन प्रक्रियेद्वारे इथेनॉलची मात्रा वाढवली जाते. सद्यकाळात विविध कर्बोदकांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यार्क निर्मितीचे मोठेमोठे उद्योग अर्थकारणाला चालना देत आहेत. हेनरी फोर्डने २०व्या शतकाच्या सुरवातीला आपली गाडी इथेनॉल वापरून चालवण्याचा प्रयत्न केला होता.

अमेरिका हा जगातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे. त्यांनी २०२१ आणि २०२२मध्ये १५ अब्ज गॅलनपेक्षा जास्त इथेनॉलचे उत्पादन केले आहे. अमेरिका आणि ब्राझील एकत्रितपणे जगातील ८०% इथेनॉलचे उत्पादन करतात. अमेरिकेत मक्यापासून तर ब्राझीलमध्ये  ऊसाचा वापर करतात.

पुणे येथील प्राज उद्योगविश्वाचे ‘इथेनॉल मॅन’, डॉ. प्रमोद चौधरी यांनी जैवऊर्जेचे महत्व जाणून पंचखंडात ७५ देशांमध्ये आपला उद्योग विस्तारलेला आहे. भारतात बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेड हा इथेनॉल तयार करणारा सर्वात मोठा उद्योग आहे. त्याची ऊस गाळप क्षमता १,३६,००० टन्स प्रतिदिन इतकी असून इथेनॉल तयार करण्याची क्षमता ८०० लीटर प्रतिदिन इतकी आहे.

प्रश्न असा आहे की, इथेनॉल पेट्रोलची जागा घेऊ शकते का? इथेनॉल हे पेट्रोलऐवजी वापरता येणारे पर्यायी इंधन आहे. पण दोन्हींची ऊर्जा देण्याची क्षमता समान नसते. पेट्रोलसाठी कोणतेही पर्यायी इंधन किती प्रमाणात वापरल्यास ते पेट्रोलच्या एका गॅलनइतकी ऊर्जा देऊ शकते; याची तुलना करण्यासाठी ‘गॅसोलीन गॅलन समतुल्यता’ (जीजीइ) हे एकक वापरतात. त्यानुसार इथेनॉलची जीजीइ किंमत पेट्रोलपेक्षा १.५ पट आहे. याचा अर्थ इथेनॉल स्वस्त असले तरी पेट्रोलइतकी ऊर्जा मिळवण्यासाठी इथेनॉल जास्त प्रमाणात लागते. यामुळे प्रत्यक्ष वापरात ते महाग पडते.

इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण म्हणून वापरण्याची भारताची क्षमता २०२५ साली १५% वरुन २०% पर्यंत वाढली असल्यामुळे भविष्यकालीन शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात इथेनॉल हे क्रांतिकारी ठरणार आहे.

डॉ. जयश्री कृष्णा सैनिस