२२-०९-२०२५ | शाकाहारी सूक्ष्मजीव

‘शाकाहारी सूक्ष्मजीव’ हे शीर्षक वाचून थोडे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. खरेतर हे सजीव त्यांच्या प्रकारानुसार पोषणाच्या बाबतीत अतिशय लवचिक, अनुकूलनक्षम आणि गुंतागुंतीचे असतात. त्यांना आवश्यक पोषणतत्त्वे जसे की कार्बन, नायट्रोजन, विविध क्षार, जीवनसत्त्वे आणि वाढीस पूरक द्रव्ये हे कोणत्याही स्रोतांमधून मिळाले, तरीही ते स्वीकारण्यास सक्षम असतात. म्हणूनच अशा सूक्ष्मजीवांना ‘सर्वभक्षी पोषणक्षम’ असे संबोधले जाते. प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमात कोणते घटक वापरले जातात, ही माध्यमं प्राणिजन्य उत्पत्तीची (जसे की मांस, रक्त, पित्त) आणि वनस्पतीआधारित (गहू, सोया, मका, साखरऊस, बीट इत्यादीं) या दोन प्रकारांत विभागली जातात.

पारंपरिक सूक्ष्मजीवशास्त्रात प्राणिजन्य माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. मात्र १९८० च्या दशकात युरोपात ‘मॅडकाऊ डिसीज’ ज्याला शस्त्रीय भाषेत ‘बोवाइन-स्पॉन्जिफॉर्म-एन्सेफॅलोपॅथी’ (बी.एस.इ.) असे म्हणतात. अशा रोगट प्राण्यांमधून मानवात पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांच्या घटनांमुळे प्राणीजन्य माध्यमांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाले. ट्रान्समिसिबल स्पॉन्जिफॉर्म-एन्सेफॅलोपॅथी (टी.एस.इ.) आणि बी.एस.इ. हे मेंदूवरील संक्रामक, प्राणघातक विकार असून, प्राणीजन्य पोषण माध्यमांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर शंका उपस्थित करतात. यामुळे काहीवेळा जैवसुरक्षेचा धोका उद्भवतो. शिवाय, प्राणिजन्य पदार्थांबाबत सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या अस्वस्थता जाणवणाऱ्या व्यक्तींसाठी ते अस्वीकारार्ह ठरतात. यामुळे वनस्पतीजन्य पोषणमाध्यमांच्या गरजेला चालना मिळाली.

प्राणिविरहित पोषणमाध्यमांचा वापर प्रायोगिक पातळीवर प्रथम लुई पाश्चर यांनी १८६० साली केला. मात्र हे प्रयोगशाळांमध्ये रूढ झाले नाही. पुढे १९७०च्या दशकात सोया व गहू यांसारख्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रथिनांचा वापर करून व्यावहारिक पोषणमाध्यमे तयार होऊ लागली. यामध्ये ‘ट्रिप्टिकेस सोयाअगार’ सारख्या माध्यमांचा समावेश होतो. तसेच, म्युलर हिंटन अगार, सोयाबीन-केसिन डाइजेस्ट अगार आणि मॉल्ट एक्स्ट्रॅक्ट अगारसारख्या वनस्पतीजन्य माध्यमांवर बॅसिलस सटिलिस, साल्मोनेला टायफिम्युरियम, कँडिडा अल्बिकन्स, अ‍ॅस्परजिलस ब्राझिलीएन्सिस आणि सॅक्रोमायसेस सेर्व्हिसिये यांसारख्या जीवसृष्टीची समृद्धवाढ अनुभवता येते.

प्राणीपालन, कत्तल आणि त्या संबंधित प्रक्रियांपासून पूर्णपणे मुक्तता मिळाल्यामुळे या माध्यमांचा वापर अधिक स्विकारार्ह ठरतो. युरोपियन आयोगाच्या अहवालानुसार, वनस्पती आधारित जैवउत्पादन प्रक्रियेदरम्यान हरितगृहवायूंचे उत्सर्जन सरासरी ४५ टक्क्यांनी घटते. जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, लशींचा विकास आणि अन्न-निदान क्षेत्रांतील वाढत्या वापरामुळे वनस्पतीजन्य माध्यमांचा जागतिक वाटा झपाट्याने वाढतो आहे. तथापि, काही विशेष पोषणविषयक गरजा असलेले जीवाणू अशा माध्यमांवर अपेक्षित वाढ दर्शवत नाहीत. एकाच वनस्पतीपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये सूक्ष्मरासायनिक फरक असू शकतात, त्यामुळे सातत्य राखणे हे आव्हानात्मक ठरते.

डॉ. गिरीश  महाजन