माणसाने बुद्धिमत्तेच्या कितीही फुशारक्या मारल्या तरी तो ना स्वतःचे अन्न तयार करू शकत ना प्राणवायू. या दोहोंच्या नैसर्गिक निर्मितीसाठी आवश्यक असते ते हरितद्रव्य. झाडांच्या पानात हरितद्रव्य असते पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मात्र वनस्पती खूप अलीकडच्या. पृथ्वीवर पहिला जीव उत्क्रांत होत असतांना त्यावेळच्या हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड आणि मिथेनयुक्त वातावरणात नक्कीच त्याने स्वतःचे अन्न निर्माण करण्याची सोय केली असावी. म्हणजे या पुरातत्वजीवांनी (अर्कीबॅक्टेरिया) प्राणवायूविरहित वातावरणात हरितद्रव्यांच्या माध्यमातून अन्ननिर्मिती करून स्वत:चे अस्तित्व टिकवले असावे!
कार्याच्या दृष्टीने जीवाणूंतल्या आणि स्पष्ट केंद्रकीजीवांच्या हरितद्रव्य प्रकारांत काय फरक असतात ते पाहू. वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषणात ऑक्सिजन वायू उत्सर्जित होतो तर जीवाणूच्या प्रकाशसंश्लेषणात ऑक्सिजन वायू उत्सर्जित होत नाही. वनस्पतीत पाणी हा इलेक्ट्रॉन दाता असतो तर जीवाणूत हायड्रोजन सल्फाइड किंवा इतर सेंद्रिय अथवा असेंद्रिय रेणू इलेक्ट्रॉन दाता असतात. वनस्पतीत फोटो सिस्टिम १ आणि २ या कार्यरत असतात तर जीवाणूत फक्त फोटो सिस्टिम १ असते. वनस्पतीत क्लोरोफिल ए आणि बी कार्य करते; तर जीवाणूत फायकोबिलीन किंवा बॅक्टेरिओक्लोरोफिल कार्यरत असते. आणि सगळ्यात मोठा फरक असा की वनस्पतीत ही क्रिया क्लोरोप्लास्टमध्ये होते तर जीवाणूत ती क्लोरोसोम्स किंवा क्रोमॅटोफोर्समध्ये घडते.
पृथ्वीवर, हिरव्या प्रकाशसंश्लेषी वनस्पतींकडून प्रकाश आणि कार्बनडायऑक्साईड शोषणे आणि ऑक्सीजन वायू बाहेर टाकणे ही क्रिया बर्याच कालांतराने सुरू झाली. त्याआधी वेगळ्या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण जांभळे जीवाणू (पर्पल बॅक्टेरिया), हिरवे जिवाणू (ग्रीन बॅक्टेरिया), आणि गंधकयुक्त जीवाणू (सल्फर बॅक्टेरिया) अशा काही जीवाणूंतील हरितद्रव्याच्या मदतीने होत असे. हे जिवाणू ‘थायोर्होडेसी’ ‘अथायोर्होडेसी’ ‘हायपोमायक्रोबीएसी’ आणि ‘क्लोरोबॅक्टेरिएसी’ अशा चार कुटुंबातून येतात. प्रकाशसंश्लेषण करणार्या पाच प्रजातींचे दोन विभाग पडतात. ऑक्सिजनयुक्त आणि विनॉक्सि जिवाणू. ऑक्सिजनयुक्त प्रकारात सायनो बॅक्टेरिया आणि प्रोक्लोरोफाईट्स यांचा समावेश होतो. या प्रकाशसंश्लेषण पद्धतीत ऑक्सीजन निर्मिती होते. विनॉक्सि जीवाणू प्रकारात पर्पल बॅक्टेरिया, ग्रीन बॅक्टेरिया, हेलिओ बॅक्टेरिया आणि ग्रीन ग्लायडिंग बॅक्टेरिया यांचा समावेश होतो. हे जीवाणू अंदाजे तीन कोटी वर्षांपूर्वी विकसित झाले आहेत. यात विनॉक्सि जीवाणूंचे प्राबल्य अधिक आहे. तेव्हाचे सर्व सजीव प्राणवायूविनाच जगत. काही जीवाणूंची वाढ ऑक्सिजन मिळाल्यास खुंटत असे.काही जीवाणूंसाठी तर प्राणवायू प्राणघातक विषच ठरे. खरेतर जीवाणूंतील हरितद्रव्य हे सजीवांचा अतिप्राचीन वारसाच आहे.
नारायण वाडदेकर