मान्सूनचा पाऊस हे निसर्गाचे आपणास मिळालेले फार मोलाचे वरदान आहे. जैवविविधतेची श्रीमंती याच पावसावर अवलंबून असते. पहिल्या पावसाचे आगमनच मुळी सुगंधी असते.पहिल्या पावसाचे थेंब जेंव्हा उन्हाळ्यात तापलेल्या मातीवर तडतडत पडतात, तेव्हाच या सुवासाची निर्मिती होते. या प्रक्रियेस ‘पेट्रिकोर’ असेही म्हणतात. पेट्रीकोरमध्ये माती, ओझोन, सूक्ष्मजीव आणि वनस्पतींच्या मुळांव्दारे मातीत मिसळलेल्या तेलांच्या सूक्ष्म थेंबांचे मिश्रण असते. या सुवासास ‘जिओस्मिन’ असेही म्हणतात. ‘जिओ’ म्हणजे माती आणि ‘स्मिन’ म्हणजे सुवास. ‘मातीत हा सुवास नेमका कशामुळे येतो’, हा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे.
जिओस्मिन हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांनी बनलेले एक नैसर्गिक रसायनिक संयुग आहे. हे रसायन नील-हरित शैवाल (सायनोबॅक्टेरिया), अक्टिनोमायसेटीस गटातील तंतुमय जीवाणू, काही अदिजीव तसेच काही प्रगत जीवही तयार करतात. जिओस्मिन प्रामुख्याने स्ट्रेप्टोमायसिस या जीवाणूद्वारा सोडले जाते. अक्टिनोमायसेटीस जीवाणू बीजनिर्मितीच्या वेळी हे रासायनिक संयुग तयार करतात. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यावर ही बीजे आणि जिओस्मिनयुक्त कण हवेत पसरतात. आर्द्र हवा या रसायनाचा सुगंध हवेत पसरवते आणि तो सुगंध सर्वदूर दरवळू लागतो. हाच तो ओल्या मातीचा सुगंध!
जोरदार पावसापेक्षा रिमझिम पावसात जिओस्मिनचा सुवास जास्त दरवळतो. पहिल्या पावसात नदी, नाले, ओढ्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याला जिओस्मिनमुळे विशिष्ट मातकट चव येते. पाण्याचा सामू कमी झाला की, जिओस्मिनचे विघटन होते आणि सुवास नष्ट होतो. जिओस्मिनची निर्मिती ही मातीच्या सुपिकतेची पावती आहे. ज्या मातीला हा सुवास जास्त तेवढी ती माती जिवंत, उपयोगी जीवाणूंनी समृध्द आणि योग्य सामू असलेली आहे, असे समजावे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असतो आणि रासायनिक खत जवळपास शून्य असते, तेथे जिओस्मिन नेहमीच जास्त असते. मातीचा हा सुवास पारंपरिक पिकांच्या पौष्टिकतेचा निर्देशांक आहे.
जिओस्मिन हे शिकारी कीटकांना दूर लोटतात तर बीजाणूंचा प्रसार करणार्या जंतूना आकर्षित करतात. स्ट्रेप्टोमायसिस जीवाणू ज्यावर उदरनिर्वाह करतात ते पदार्थ फळमाशीही खाते. परंतु, जिओस्मिनच्या वासाने ही माशी दूर लोटली जाते. हे निसर्गातील परस्पर सहकार्याचेच उदाहरणच नव्हे का?
माणसाचे नाक ०.००६ मायक्रोग्रॅम प्रतिलिटर येवढ्या अत्यल्प जिओस्मिनच्या वासाला ओळखू शकते. शेवटी, मातीचा हा सुगंध इतर कोणत्याही अत्तराच्या सुगंधापेक्षा मनाला अधिक भावणारा असतो, नाही का?
डॉ. रंजन गर्गे