२५-११-२०२५ | सूक्ष्म शैवाल : शाश्वत जीवनाधार!

वनस्पती प्लवक समुद्राच्या खाऱ्या पाण्यात, खाडीत, आंतरभरती क्षेत्रातल्या मिठागरात, चिखलात व नदीतल्या गोड्या पाण्याच्या अधिवासात आढळतात. वनस्पती प्लवकांच्या समूहातील सूक्ष्म शैवाल प्रकाशसंश्लेशणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

वातावरणातला कार्बन सूक्ष्म शैवालांच्या पेशीत साठतो. हे शैवाल, प्राणीप्लवक व इतर मोठ्या प्राण्यांचे खाद्य असते. त्यामुळे कार्बनची साखळी पुढे सुरू राहते. मृतावस्थेतील जलचर समुद्राच्या तळाशी जातात, तेव्हा हा कार्बन समुद्रतळाशी साठतो. त्यामुळं समुद्रतळाशी वर्षानुवर्षे कार्बनचे साठे तयार होतात. तसेच खूप मोठ्या प्रमाणात सागरी परिसंस्था, मिठागरे इथेही कार्बन साठतो. ह्यालाच ‘ब्ल्यू कार्बन’ म्हणतात. सूक्ष्म शैवाल वातावरणातला कार्बन खेचून समुद्रतळाशी पोहोचवताना एखाद्या पंपासारखे काम करतात.

गरजेपेक्षा अधिक कार्बन समुद्रात शोषला गेल्यास पाण्याचे आम्लीकरण होते. परंतु पाण्यात ‘डायटम’ नावाची एक पेशी सूक्ष्म शैवाल पाण्यात असल्यामुळे ते अतिरिक्त कार्बन शोषून समुद्रातील पाण्यातली आम्लता कमी करतात. डायटम किनाऱ्यालगत, सिलिका, नत्र आणि फॉस्फरस असलेल्या पाण्यात विपुल असतात. उच्च अक्षांश क्षेत्रात, ऋतूबदलानुसार समुद्राच्या तळातील थंड आणि पोषकतत्वांनी समृद्ध असलेले पाणी समुद्राच्या पृष्ठभागाकडे येते. हे सहसा वार्‍यामुळे आणि पृथ्वीच्या फिरण्यामुळे होते. त्यात डायटम भरपूर असतात. ते प्रदूषणाचे नैसर्गिक निर्देशक आहेत. ते प्रदूषित पाण्यातसुद्धा वाढतात, त्यामुळे वैज्ञानिकांना अनेक प्रयोगांसाठी डायटम व त्यांचा बायोमास उपलब्ध होतो. डायटम हरितगृह वायूमधील कार्बन शोषून हवामान बदलामुळे होणारे नुकसान कमी करतात. डायटममधून मिळणारा बायोमासहाजैविक इंधन, लिपिड्स व महत्त्वाचे जैवरेणूयांसारखी जैविक रिफायनरीची उत्पादने तयार करतो; त्यामुळे जीवाश्म इंधनाला नैसर्गिक पर्याय मिळतो. पोषकखाद्य व सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात हे सूक्ष्म शैवाल बहुमोल ठरतात.

दीर्घ मुदतीच्या अवकाश मोहिमांमध्ये शाश्वत जीवनाधार शोधण्यासाठी जुलै २०२५ मध्ये  गेलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेत, अवकाश स्थानकावर शुभांशु शुक्ला यांनी सूक्ष्म शैवालावर प्रयोग केले. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि उत्सर्जित किरणांचा सूक्ष्म शैवालाची वाढ आणि चयापचय क्रिया यांच्यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला. सूक्ष्म शैवालाची वाढ होत असतांना पेशीत अणुपातळीवर होणारे बदल आणि त्याचा प्रामुख्याने अन्न, प्राणवायू आणि जैवइंधन उत्पादनाच्या वाढीवर होणारा परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

हरितगृह वायूंचा निचरा करण्यासाठी वैज्ञानिक सूक्ष्म शैवालाचा विचार करीत आहेत. हवामान बदलामुळे पृथ्वीचे तापमान धोक्याची पातळी ओलांडण्यापूर्वी सूक्ष्म शैवालांचे अधिवास सुरक्षित ठेवावे लागतील.

डॉ. श्वेता चिटणीस