२५-१२-२०२५ | भारती विद्यापीठाची संशोधन प्रयोगशाळा

इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल फॉर हेल्थ अफेयर्स (ईर्षा) ही भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची एकमेव घटक संस्था असून ती मानवी आरोग्याविषयक संशोधनासाठी अग्रगण्य आहे. याची स्थापना सन २००१मध्ये झाली. भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंत महाविद्यालये, माहिती आणि जैवतंत्रज्ञान संस्था, पर्यावरण विज्ञान इत्यादी घटकांशी तसेच केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान आणि आरोग्यविषयक संस्थांशी समन्वय साधून मानवी आरोग्य क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याचे काम या संस्थेमध्ये होते.येथील संशोधनाच्या मुख्य क्षेत्रात माता व बाळांचे आरोग्य, कर्करोग, लठ्ठपणा-मधुमेह,वनौषधी,संसर्गजन्य रोग आणि पोषणशास्त्र यांचा समावेश आहे.संस्थेचे निदेशक डॉ. ए.सी.मिश्रा व वैज्ञानिक सल्लागार डॉ. एम.व्ही. हेगडे यांच्यासह १६ शास्त्रज्ञ येथे कार्यरत आहेत.

संस्थेकडे अत्याधुनिक‘जैविक सुरक्षा पातळी -३’ सुविधांसह सुसज्ज संशोधन प्रयोगशाळा आहेत. विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनातून पुढील पिढीसाठी संशोधनातून पोस्ट-डॉक्टरेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.या संस्थेला केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान, विज्ञानआणि तंत्रज्ञान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, आयुष आणि वेलकम ट्रस्ट सारख्या शिखर संस्थांकडून अनुदान मिळाले आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवप्रौद्योगिकी उद्योग संशोधन सहाय परिषद यांच्या राष्ट्रीय बायोफार्मा अभियानाद्वारे विषाणूजन्य लसींच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे मूल्यमापन केले जाते.यासाठी ईर्षा या संस्थेत राष्ट्रीय प्रतिजनक्षमता आणि जैवद्रव्य मूल्यांकन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.येथे अनेक महत्त्वाच्या विषाणू प्रतिकारक क्षमतेच्या चाचण्या करण्यासाठी आवश्यक असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा आहेत.लस तयार करताना सुरक्षितता, मानवी रोगप्रतिकारक शक्तीआणि मानवी चाचण्यांतील परिणामकारकता निश्चित करणे या बाबी महत्त्वाच्या असतात. यासाठी मानवासाठी घेतलेल्या चाचण्यांचे व्यापक मूल्यांकन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रयोगशाळेतील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असते.

येथे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि सार्स-कोविड-२ अशा घातक विषाणूंसाठी मूल्यांकन चाचण्या विकसित आणि प्रमाणित करण्यात आल्या आहेत. यामुळे रोग्याच्या रक्तात असलेली विषाणूला निष्प्रभ करणारी प्रतिपिंडे आहेत का, आणि किती प्रमाणात आहेत.तसेच रक्तातील प्रतिपिंडे विषाणूला किती प्रमाणात प्रतिकार करू शकतात का, याची माहिती मिळते.

ही संस्था अनेक आघाडीच्या भारतीय लस उत्पादक कंपन्या तसेच संशोधन संस्था कंपन्यासोबत एकात्रितपणे काम करत आहे. भारतीय जनतेच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन ईर्षा, भारती विद्यापीठाच्या सहकार्याने भविष्यात भारतातील एक आघाडीचे संशोधन केंद्र म्हणूण स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यरतअसून, सर्वांगाने प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे.

डॉ. गजानन माळी