२५-६-२०२५ | कोयनानगरचा भूकंप

११ डिसेंबर १९६७ रोजी सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगरच्या परिसरात पहाटे ४ वाजून २१ मिनीटांनी भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघा पाच किलोमीटर अंतरावर होता, तर नाभी १५ किलोमीटर खोल होती. महाराष्ट्रात फार मोठ्या क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर श्रेणीनुसार ६.६ इतकी प्रचंड होती. या भूकंपामुळे जवळपास २५ किलोमीटर अंतराच्या पट्ट्यातल्या जमिनीला रुंद भेगा पडल्या होत्या.

केंद्रबिंदूपासून २५ किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे भयानक परिणाम दिसून आले. १७७ जण मृत्यूमुखी पडले. २२७२ जण जखमी झाले. ग्रामिण भागात कित्येक कच्ची घरे पडून पन्नास हजारांहून अधिक लोक बेघर झाले. गोठे पडल्याने पाळीव जनावरेही गेली. धरणाच्या बांधकामालाही तडे गेले होते. धरणाच्या पश्चिमेला काही अंतरावर असणाऱ्या डोंगराळ भागात भूकंपामुळे एका ठिकाणी कडा तुटला होता. भारतीय द्वीपकल्पातल्या या भागात एवढ्या मोठ्या  तीव्रतेचा, आणि इतका विनाशकारी भूकंप होणे अपेक्षित नसल्याने या भूकंपाने भूवैज्ञानिकांना चांगलेच संभ्रमात टाकले.

असाही एक मतप्रवाह होता, की १९६३ साली कोयना धरणाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर १९६४ च्या पावसाळ्यापासून या धरणाच्या ‘शिवसागर जलाशया’त पाणी साठवायला सुरुवात झाली. त्यानंतर तीनच वर्षांनी हा भूकंप झाला. १०३ मीटर उंचीचे धरण, तसेच त्यावरील जलविद्युत प्रकल्प यांपासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे जलाशयात साठलेल्या पाण्याचा भार तिथल्या खडकांना न पेलल्यामुळेच हा भूकंप झाला असावा. या मतप्रवाहानुसार हे ‘जलाशय प्रेरित भूकंपना’चे (रिजर्वायर इंड्यूस्ड साईस्मॉसिटी) उदाहरण होते. काही संशोधन संस्थांनी केलेल्या तपशीलवार संशोधनावरून याच्या जोडीने भूगर्भातल्या अन्य काही हालचालींमुळे त्याच्यात भर पडली, त्यामुळे इतका अनर्थकारक भूकंप झाला असावा असे अनुमान निघाले.

आजही कोयना धरण क्षेत्राचा सर्वांगाने अभ्यास केला जात आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र, राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्र आणि इतर संशोधन संस्थांनी या भागात भूकंपमापनाच्या तसेच इतर काही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. १९६७ सालापूर्वी आणि नंतरही रिश्टर श्रेणीनुसार ४ ते ५ तीव्रतेच्या भूकंपांमुळे हा भाग भूकंपप्रवण आहे हे सिद्ध झाले आहे. या भूकंपप्रवण भूभागावर धरणाच्या पाण्याच्या वाढत्या भारामुळे चेतना मिळून ११ डिसेंबर १९६७ रोजी तीव्र भूकंप झाला असावा या निष्कर्षाला दुजोरा मिळत असला, तरी १५ किलोमीटर खोल नाभी असणाऱ्या भूकंपाला जलाशय कारणीभूत नाही, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अनघा शिराळकर