२६-१२-२०२५ | पसाज नंबर

सूक्ष्मजीवशास्त्रात ‘पसाज नंबर’ ही संज्ञा वापरली जाते. ‘पसाज नंबर’ म्हणजे काय?

विषाणू, जीवाणू किंवा बुरशीसारखे सूक्ष्मजीवएका पोषण माध्यमावरून दुसऱ्या पोषण माध्यमात स्थानांतरित करून वाढवले जातात, त्याला सबकल्चर म्हणतात.‘पसाज नंबर’ म्हणजे मूळ सूक्ष्मजीवाला आपण किती वेळा दुसऱ्या माध्यमात स्थलांतरित केले आहे हे मोजण्याची संख्या.उदाहरणार्थ, निसर्गातून हवा, पाणी, माती, अन्न किंवा यजमान पेशींपासून मिळालेला सूक्ष्मजीव कितीवेळा प्रयोगशाळेतील माध्यमात वाढविला गेला, ते पसाज नंबर दाखवते. उद्योगक्षेत्रात या क्रमांकाला अनन्यसाधारण महत्व आहे.

औषधनिर्मिती करणार्‍या उद्योगात या प्रत्येक आवर्तनाची नोंद ठेवली जाते. काही संस्थांमध्ये तर प्रत्येक सूक्ष्मजीवाचे किती वेळा पेशी विभाजन झाले हे नोंदवले जाते. परंतु सर्वसाधारणपणे मात्र तो सूक्ष्मजीव एका पोषण माध्यमवरून दुसर्‍या पोषण माध्यमात किती वेळा स्थलांतरित केला याची नोंद ठेवण्याची पद्धत आहे. पसाज-० (पी-शून्य) म्हणजे तो निसर्गातून मिळवलेला सूक्ष्मजीव आहे आणि तो प्रयोगशाळेत एकदाही सबकल्चर केला गेलेला नाही. पसाज-० याला शून्य पसाज असेही संबोधले जाते.

पसाज-१ (पी-एक) म्हणजे सूक्ष्मजीवाला निसर्गातून मिळवल्यावर एकदाच सबकल्चर केले आहे. अशा रीतीने पसाज-२, पसाज-३ इत्यादी. प्रमाणित केलेल्या पद्धतीनुसार तो सूक्ष्मजीव साधारण अमेरिकन टाइप कल्चर कलेक्शन (एटीसीसी) संदर्भित पसाज-५ कल्चरपर्यंत औद्योगिक प्रक्रियेसाठी वापरला जावा. एखाद्या सूक्ष्मजीवाचा जनुकीय पातळीवर संशोधन अभ्यास करण्यासाठी पसाज-० वापरला जातो. यात प्रयोगशाळेतील हाताळणीमुळे उद्भवलेले बदल शून्य असतात. तो शुद्ध स्वरुपात असतो. ही आवर्तने जशी वाढत जातात तसे मूळ जनुकीय गुणधर्मात उत्पारिवर्तने व्हायला सुरुवात होते. पसाज-२० अवस्थेत कदाचित त्याचे मूळ गुणधर्म लोप पावलेले असतात. म्हणून पसाज क्रमांकाचा फर्मेंटेशन प्रक्रिया, लस निर्मिती प्रक्रिया, प्रतिजैविकांचे उत्पादन, प्रोबायोटिक्सचे उत्पादन यावर विपरीत परिणाम बघायला मिळतो. सूक्ष्मजीवांच्या संवर्धनासाठी वापरले जाणारे पोषण माध्यम हे पसाज नंबर वाढला तरी वसाहतीतील सूक्ष्मजीवांना जनुकीय स्थैर्य प्राप्त करून देते. औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचे विशिष्ट पसाज क्रमांकाचे  सूक्ष्मजीव ‘जैवतंत्रज्ञान सुविधा’ विभागात जतन करून ठेवलेले असतात. अमेरिकन टाइप कल्चर कलेक्शन (एटीसीसी), नॅशनल कलेक्शन ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोऑरगॅनिझम्स, इंडिया मायक्रोबियल टाइप कल्चर कलेक्शन, इंडिया. एमएसीएस कलेक्शन ऑफ मायक्रोऑरगॅनिझम्स, पुणे यासारख्या माध्यमातून जीवाणू, विषाणू आणि बुरशी यांची कल्चर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवली जातात. या सर्व संस्था पसाज नंबर ० ते १० मधील कल्चर्स उपलब्ध करून देतात.

डॉ. रंजन गर्गे