२६-०९-२०२५ | मेड इन इंडिया – हायमिडीया

सुमारे १९६० ते १९७० या दशकातला तो काळ! भारत विज्ञानाच्या अनेक अंगांमध्ये नव्या उमेदीनं वाटचाल करत होता. परंतु सूक्ष्मजीव पोषणमाध्यमांच्या निर्मितीत मात्र एक मोठी पोकळी होती. त्यासाठी त्याकाळी संपूर्ण देश परदेशी कंपन्यांवर अवलंबून होता. या माध्यमांची किंमत सोन्याच्या दरांपेक्षाही अधिक होती! अशा काळात, एका दूरदृष्टीसंपन्न सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाने या स्थितीला थेट आव्हान दिलं. डॉ. गंगाधर वारके यांनी ‘हायमिडीया’ ही संकल्पना मांडली. भारतातच सूक्ष्मजीव पोषणमाध्यमांची निर्मिती सुरू करण्याचा ठाम निर्धार केला.

प्रत्येक सूक्ष्मजीवाची पोषणगरज वेगळी असते. काहींना सामान्य पोषणद्रव्यांचा अगार पुरतो, तर काहींना विशिष्ट पोषणद्रव्यांची गरज असते. हायमीडिया लॅबोरेटरीज या संपूर्णतः भारतीय कंपनीने या सूक्ष्म व महत्त्वपूर्ण पोषणगरजांचे अचूक भान ठेवले आणि सूक्ष्मजीवविज्ञानाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.

१९७४ साली डॉ. गंगाधर वारके, त्यांच्या पत्नी श्रीमती सरोज वारके आणि बंधू श्री. विष्णू वारके यांच्या सहकार्याने ‘हायमिडीया’ ची मुहूर्तमेढ रोवली गेली. परदेशी उत्पादनांवर अवलंबून न राहता स्वदेशी पोषणमाध्यमे व त्यास पूरक उत्पादने तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. अवघ्या ५ उत्पादनांनी सुरू झालेली ही प्रयोगशील वाटचाल आज २०,०००हून अधिक जैव-उत्पादनांपर्यंत विस्तारली आहे.

हायमिडीयाच्या क्रोमोजेनिक माध्यमांद्वारे अन्न व जलपरीक्षणातील कोलिफॉर्म व ई. कोलाई यांची जलद व अचूक ओळख शक्य झाली. एलजे व एमजीआयटी माध्यमांनी क्षयरोगजनक मायकोबॅक्टीरियाच्या संवर्धनात नवे मापदंड प्रस्थापित केले. समुद्रसपाटीखालचे अॅक्टिनोबॅक्टेरिया, आर्क्टिकच्या बर्फाळ भूमीतील प्रजाती, तसेच उष्ण झऱ्यांमधील उष्णताप्रेमी सूक्ष्मजीव यांचे यशस्वी संवर्धन ही हायमिडीयाच्या विशेष पोषणमाध्यमांची शास्त्रीय कमाल ठरली आहे.

कोविड-१९ महामारीच्या काळात कंपनीने कोट्यवधी व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम (व्हीटीएम) टेस्टकिट्स व ‘आरएनए’ निष्कर्षण टेस्टकीट्स देशभर वितरित करत भारताच्या जैवतांत्रिक आत्मनिर्भरतेला खंबीर पाठबळ दिलं. हायमिडीयाने केवळ सूक्ष्मजीवच नव्हे तर पेशी-संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारलेली आहे.

सेल व मोलेक्युलर बायोलॉजी, प्लांट टिश्यूकल्चर, आणि फॉरेन्सिक विज्ञानसारख्या क्षेत्रांतही हायमिडीयाचे योगदान उल्लेखनीय आहे. या प्रयोगशाळेला सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ‘विज्ञान आणि औद्योगिक अनुसंधान विभाग’ची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. एटीसीसी या अमेरिकेच्या प्रथितयश कंपनीशी त्यांची भागीदारी आहे. आज या प्रयोगशाळेचे जाळे १५० देशात पसरलेले आहे. येथे १४७ शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. जगभर सूक्ष्मजीवांपासून सुरू झालेल्या प्रवासात ‘मेड इन इंडिया’ संकल्पनेचा खरा गौरव म्हणजेच ‘हायमिडीया’! भारतीय जैववैज्ञानिक सामर्थ्याचं जागतिक प्रतिक!

डॉ. गिरीश महाजन