२७-११-२०२५ | बायोकॉन

बायोकॉन लिमिटेड ही भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील एक फार मोठी कंपनी आहे. २९ मे १९७८ साली या कंपनीची स्थापना झाली. किरण मजुमदार शॉ हे या कंपनीचे संस्थापक आहेत.  सिद्धार्थ मित्तल प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. नवीन औषधी रेणू विशेषतः विकरे शोधून काढणे आणि मधुमेह, कर्करोग, वेगवेगळे आत्मप्रतिरक्षा रोग यापासून रुग्णांना दिलासा देणे; हे काम बायोकॉन करते. हे काम करताना जगभरच्या विकसनशील देशातील रुग्णांना औषधोपचार परवडतील याचीही काळजी बायोकॉनला करावी लागते. भारतात उच्चशिक्षित आणि तंत्रकुशल मनुष्यबळ यूरोप अमेरिकेच्या मानाने स्वस्त दराने उपलब्ध असते. ह्या फायद्यामुळे बायोकॉनला स्वतःच्या उत्पादनांचे मूल्य अन्य कंपन्यांच्या तुलनेत स्पर्धा करायला योग्य म्हणजे बरेच कमी ठेवू शकते.

मूळ जैविक औषधे महाग असतील वा सहज मिळण्यासारखी नसतील तर बायोसिमिलर म्हणजे जैवसम, तुलनेने स्वस्त औषधे बायोकॉन उपलब्ध करून देते.

कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय निदेशक श्रीहास तांबे यांच्या म्हणण्यानुसार ही कंपनी अमेरिकी बाजारपेठेत लवकरच इन्सुलिन विस्तार कार्यक्रमांतर्गत लठ्ठपणाविरोधी जीएलपी-१ रोगोपचार पद्धती विकसित करत आहे. कॅलिफोर्नियामध्ये ‘इन्सुलिन ग्लार्जिन पेन’ ‘कार्लेक्स’ या नावाने ११ डॉलर्स प्रति पेन या दराने विकला जाणार आहे. लवकरच जलद-प्रक्रिया इन्सुलिन ‘किर्स्टे’ नावाने बाजारात उपलब्ध होणार आहे.

जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या उदा. ‘लिपिटॅार’च्या तुलनेने स्वस्त असतात. पण तेवढीच प्रभावी असतात. बायोकॉन अशा जेनेरिक औषधांच्या उदा. मेदनियंत्रक अटॅारव्हॅस्टॅटिन  निर्मितीत अग्रेसर आहे. तसेच जेनेरिक औषधांच्या निर्मितीत लागणारे सक्रीय घटक तयार करण्यात बायोकॉन आघाडीवर आहे. तब्बल १२० देशांना बायोकॉन जेनेरिक औषधांचे सक्रीय घटक पुरवते. मग ते घटक वापरून ते देश त्यांच्या देशांत स्थानिक जनतेसाठी औषधनिर्मिती करतात.

बायोकॉन लिमिटेड या मोठ्या मातृसंस्थेच्या छत्राखाली सिन्जीन इंटरनॅशनल ही संस्था ठेकेदारी पद्धतीने संशोधन प्रकल्प हाती घेते.

बायोकॉन लिमिटेड ही कंपनी केवळ संशोधन व तंत्रज्ञान यात प्रवीण आहे असे नाही तर, स्वतःच्या गुणांमुळे ग्राहकांचा विश्वास संपादून भांडवल उभारणी करण्यातही कमालीची यशस्वी ठरली आहे. २००४ साली बायोकॉनचा शेअर बाजारातील प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) कमालीचा लोकप्रिय ठरला. जनतेने पहिल्याच दिवशी ११० कोटींच्यावर रुपयांची गुंतवणूक केली. हा विश्वास सार्थ ठरवत बायोकॉनने ‘इन्सुजेन’ हे मधुमेहावरील नवे औषध बनवणारा आशियातला सर्वात मोठा कारखाना उभारला.

नारायण वाडदेकर