२७-६-२०२५ | भूवैज्ञानिकांसाठी असणार्‍या संधी

भूविज्ञान ही पृथ्वीच्या आंतरिक आणि बाह्य संरचनांचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा आहे. भूवैज्ञानिक पृथ्वीवरील खडकांच्या रचनात्मक वैशिष्ट्यांचा आणि खनिजांच्या उत्पत्तीचा शोध घेतात. भूकंपांच्या आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांच्या नोंदी ठेवतात. त्यासंबंधी समाजात जागृती निर्माण करतात. पर्वत निर्मितीच्या प्रक्रियांचा, तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जे विविध प्रकारचे बदल होतात (चेंजिंग फेस ऑफ द अर्थ) त्यांचा अभ्यास करतात. जीवाश्मांचा (फॉसिल्स) अभ्यासही या विज्ञानशाखेत केला जातो. त्यामुळे पृथ्वीवरच्या पाषाणसमूहांच्या निर्मितीच्या पाठीमागे असणाऱ्या प्रक्रियांचे आकलन होते. तसेच या सर्व प्रकारच्या भूवैज्ञानिक घटनांचे सखोल विश्लेषण करता येते.

भूविज्ञान या विषयाची माहिती शालेय स्तरावर फारशी दिली जात नाही. महाविद्यालयीन स्तरावरदेखील हा विषय अगदी मोजक्या महाविद्यालयांमधे शिकवला जातो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरही सर्व विद्यापीठांमधे हा विषय पदव्युत्तर स्तरावर शिकवला जात नाही. त्यामुळे या स्वारस्यपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त विज्ञानशाखेची खूपजणांना माहितीसुद्धा नसते.

हा विषय जर व्यवसायक्षेत्र म्हणून निवडायचा असेल, तर त्याच्या शिक्षणाची सुरुवात बारावीपासून, किंवा महाविद्यालयीन स्तरावरच्या शिक्षणापासून करावी लागते. आणि ज्या शिक्षणसंस्थांमधे हा विषय शिकवण्याची सोय आहे, तिथे प्रवेश घ्यावा लागतो. बी. एससी. पदवी घेताना खनिजविज्ञान (मिनरॉलॉजी), पाषाणविज्ञान (पेट्रॉलॉजी), भूरूपविज्ञान (जिओमॉर्फॉलॉजी), पुराजीवविज्ञान (पॅलिऑन्टॉलॉजी), भारतीय प्रस्तरविज्ञान (इंडियन स्ट्रॅटिग्राफी), सांरचनिक भूविज्ञान (स्ट्रक्चरल जिऑलॉजी) हे आणि इतर काही विषय शिकवले जातात. पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर भूविज्ञान (जिऑलॉजी) किंवा उपयोजित भूविज्ञान (अॅप्लाइड जिऑलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. हे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीही आयोजित केल्या जातात. अशा सहलींमधे विद्यार्थ्यांना क्षेत्रीय सर्वेक्षणाचे (फील्ड सर्व्हे) तंत्र शिकवले जाते. एखाद्या खाणीला भेट आयोजित केली जाते. आणि त्यांना भूवैज्ञानिक मानचित्रणाचे (जिऑलॉजिकल मॅपिंग) पाठ शिकवले जातात.

भूवैज्ञानिकांना विविध क्षेत्रांमधे संधी उपलब्ध असतात. निरनिराळ्या खनिजांचे अन्वेषण आणि खाणकाम करणारे उद्योग, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र, जलसंपत्ती व्यवस्थापन, भूकंपविज्ञान, पर्यावरणीय समस्यांचे निराकरण, अशा कामांशी संबंधित आस्थापनांमधे भूविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकवर्गाला संधी असतात. केंद्र शासन आणि अनेक राज्य शासनांचे भूविज्ञानाशी संबंधित विभाग आहेत. विविध खनिजांसाठी अन्वेषण, अभियांत्रिकी भूविज्ञान भूजलाचा शोध, किरणोत्सारी खनिजांचा शोध, अशा निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळे विभाग असतात. तिथे भूवैज्ञानिकांना केवळ संधीच असतात असे नाही, तर कामासाठी खूप सोयी-सवलती असतात.

डॉ. मयूरा मार्तंडराव देशमुख