पॉली रॉय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांना न्युयॉर्क विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना आण्विक विषाणूशास्त्र (मॉलेक्युलर व्हायरॉलॉजी) विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. प्रसिद्ध अणुजीवशास्त्रज्ञ सोल स्पिजेलमन यांच्या मार्गदर्शनामुळेत्यांना संशोधनास प्रेरणा मिळाली. पॉली यांनी पुढील तीन वर्षे रुटजेर विद्यापीठात सुक्ष्मजीवाशास्त्राच्या वॉक्समन संस्थेत आरएनए व्हायरॉलॉजी या विषयात पोस्ट डॉक्टरल संशोधन केले. त्यानंतर बर्मिंगहॅम येथील अलबामा विद्यापीठात त्या ‘ब्ल्यू टंग’विषाणूवरकाम करणाऱ्या चमूत सहभागी झाल्या. १९८७ साली त्या अलाबामा विद्यापीठात प्राध्यापक झाल्या. पुढे त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठाची फोगारटी शिष्यवृत्ती मिळाली.१९९७ साली तेथेच त्या प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या. २००१ साली लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेत प्रोफेसर म्हणून काम करताना त्यांनी वैद्यक सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे अभ्यासक्रम तयार केले.
मेंढी आणि गुरांना होण्यार्या ब्ल्यू टंग रोगावर संशोधन करण्यात त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांचे कार्य प्रामुख्याने विषाणूंचे अनुवंशशास्त्र, प्रथिनांचे कार्य, पेशीतील विषाणूंचा प्रवास आणि कण स्वरुपातील लस निर्मितीचे तंत्र यासाठी वाहिलेले आहे.
‘ब्ल्यू टंग’ विषाणूचा आकार, त्याचे प्रजनन, त्याचा शरीरात होणारा प्रसार यावर त्यांनी ३०० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. हा संसर्गजन्य रोग नाही. हा वाहकाद्वारा बकरी, गुरे, ढोरे यांच्यात पसरणारा रोग आहे. मिडजेस या माशीच्या क्युलिकॉईडिस प्रजातीच्या चाव्यातून हा विषाणू मेंढी-गुरा-ढोरांच्या शरीरात प्रविष्ट होतो. तोंडातून जास्त लाळ गळणे, ताप, डोके, ओठ आणि जिभेला सूज येणे, तोंड आणि नाकाला अल्सर अशा प्रकारची लक्षणे दिसतात.
त्यांची २००६ साली अकॅडेमी ऑफ मेडीकल सायन्सेसच्या फेलो म्हणून निवड झाली.२०१२ साली त्यांना वेलकम ट्रस्टच्या ‘वरिष्ठ संशोधक’ म्हणून सन्मानित करण्यात आले. २००२ साली त्यांना इंडियन सायन्स कांग्रेस मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘अध्यक्षीय सुवर्णपदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. २०१२ साली जैवतंत्रज्ञान आणि जीवशास्त्र संशोधन संस्था यांचा ‘इनोव्हेटर ऑफ द इयर’ हा सन्मान प्राप्त झाला. २०१४ साली त्यांना विषाणूंवरील संशोधनासाठी ‘ऑफिस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा किताब बहाल करण्यात आला. २०१४ साली त्यांना ‘फेलो ऑफ द सोसायटी ऑफ बायॉलॉजी’ चे सदस्यत्व प्राप्त झाले.
डॉ. रंजन गर्गे