जीवदीप्ती किंवा स्फुरदीप्ती म्हणजे विशिष्ट जीवरासायनिक प्रक्रियेमुळे काही सजीवांमध्ये उत्पन्न होणारा नैसर्गिक प्रकाश. जीवाणू, काजवे, मासे, कवके, जेलीफिश, म्हाकूळ, भुंगेरे इत्यादी सजीवांत जीवदीप्ती आढळते. जीवदीप्त सजीव या प्रकाशाचा स्वसंरक्षणासाठी, स्वतःच्या सहचराला अथवा सावजाला आकर्षून घेण्यासाठी उपयोग करतात. कुकीकटर शार्क जीवदीप्तीवापरुन छोट्या माशांना आपल्याकडे आकर्षित करतो. फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम, व्हायब्रिओनेसी शेवानेलेसी आणि एंटेरोबॅक्टेरिएसी या जातीच्या जीवाणूंचा उत्सर्जित प्रकाश काही मीटर दूर असलेली वस्तू झळाळून टाकतो. अनेक सागरी प्राणी जसे आंतरदेहगुही, कृमी, मृदुकाय, कंटकचर्मी, मासे यांच्यासह जीवदीप्तीकारक जीवाणूंचे सहजीवन असते. सुमारे १२५ बुरशी जीवदीप्त आहेत. त्यात प्रामुख्याने अॅगारिकल्स हे मशरुम आणि ओमफॅमिलीलोटस, अर्मिलेरिया, मायसेनॉइड या वंशांचा समावेश आहे.
जीवदीप्तीचा बराचसा प्रकाश ल्युसिफेरीनचा ल्युसिफरेजद्वारा ऑक्सिजनशी संयोग होऊन निर्माण होतो. समुद्रातील जीवदीप्ती निळसर हिरव्या रंगाची (४००-५०० नॅनोमीटर तरंगलांबीची) असते; तर जमिनीवरील जीवदीप्ती पिवळसर रंगाची (५६०-५९० नॅनोमीटर तरंगलांबीची) असते. या अभिक्रियेत मुक्त झालेली ८०% ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते, तर उर्वरित२०% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. जीवदीप्तीसाठी प्राणवायूची पर्यायाने श्वसनाची आणि ‘एटीपी’ची गरज असते. स्फुरदीप्ती वापरून ‘एटीपी’चे मोजमाप करता येते. पाण्यातील विषारी पदार्थांचा सुगावा लावण्यासाठीही जीवदीप्तीचा उपयोग होतो; कारण पाण्यातील रसायने जीवाणूंसाठी घातक असतील तर त्यांचे चमचमणे बंद होते.
१९६२ साली ओसामु शिमोम्यूरा शास्त्रज्ञाला जेलीफिशमध्ये हिरव्या प्रतिदीप्त प्रथिनाचा शोध लागला. १९८८मध्ये मार्टिन चलफी याने सी एलेगंसच्या गुणसूत्रात हिरव्या प्रतिदीप्त प्रथिनाच्या जनुकाचा समावेश केला आणि हे कृमी चक्क हिरवी प्रतिदीप्ती दाखवू लागले. यानंतर हिरव्या प्रतिदीप्त प्रथिनाच्या जनुकाचा इतर प्रथिनांच्या जनुकांशी संयोग करून त्या प्रथिनांच्या जीवरसायनिक क्रियांविषयी अभ्यासाचे नवे दालनच उघडले. हिरवे प्रतिदीप्त प्रथिन हे कोणतेही रंगद्रव्य वापरत नाही. हिरव्या प्रतिदीप्त प्रथिनात २३८ अमिनोअॅसिडस असतात. त्यातील तीन अमीनोअॅसिडची (सेरीन-टायरोसिन-ग्ल्यायसीन) शृंखला वापरुन प्रतिदीप्त प्रकाश निर्माण होतो. रंगरसायनाशिवाय प्रतिदीप्ती निर्माण करण्याच्या गुणधर्मामुळे या प्रथिनाचे जनुक इतर सजीवातील गुणसूत्रात घालता येते. हिरवे प्रतिदीप्त प्रथिन (३९५ नॅनोमीटर तरंगलांबीचा) अतिनील प्रकाश शोषून (५०९ नॅनोमीटर तरंगलांबीचा) हिरवा प्रकाश उत्सर्जित करते. हिरव्या प्रथिनाच्या जनुकात उत्परिवर्तन घडवून आणून अशा प्रतिदीप्तप्रथिनाच्या प्रकाशोत्त्सर्जनाचा रंग बदलण्यात शस्त्रज्ञांना यश मिळाले आहे. हिरव्या प्रतिदीप्त प्रथिनाचा उपयोग वेगवेगळ्या रंगाचे प्रतीदिप्त जीवाणू, प्राणी आणि वनस्पती निर्माण करण्यासाठी करण्यात येतो.
डॉ. जयश्री कृष्णा सैनिस