३-१२-२०२५ | जैविक खते

जैविक खते (बायोफर्टिलायझर) रासायनिक खतांना उत्तम पर्याय आहेत. या खतांमध्ये जिवंत सूक्ष्मजीव असतात. जैविक खते बिया, माती किंवा मुळांच्या भोवती वापरल्यास पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटक विशेषतः नत्र, स्फुरद, पालाश, खनिजे सहजरित्या उपलब्ध होते. जैविक खते तयार करण्यासाठी पिकांनुसार वेगवेगळ्या प्रकारचे जिवंत सूक्ष्मजीव त्यांच्याकडे असणाऱ्या विशेष गुणधर्मामुळे वापरले जातात.

किण्वन सयंत्राच्या साहाय्याने असे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळेत वाढवून ते द्रव किंवा एखादया वाहकासोबत उदा. लीगनाइट किंवा कोळश्याच्या भुकटीमध्ये मिसळून शेतांमध्ये वापरण्यास उपलब्ध केले जातात.

रायझोबिम हे जीवाणू शेंगावर्गीय वनस्पतींना (तूर, हरभरा, मूग, शेंगदाणे, सोयाबीन, इत्यादी.) उपयुक्त ठरतात. ते मुळांवर गाठी तयार करतात व हवेतील नत्र वनस्पतीस सहज उपलब्ध करून देतात. अॅझोटोबॅक्टर हा मुक्तजीवी (फ्री लिविंग) जीवाणू मातीमध्ये राहून हवेतील नत्र स्थिरीकरण करतात. ते संप्रेरके (उदा. जीब्रेलीन्स), जीवनसत्त्वे (थायमिन, रायबोफ्लावीन) आणि बुरशीविरोधी संयुगे देखील तयार करतात. त्यामुळे पिके निरोगी राहतात आणि त्यांचे उत्पादन वाढते. तांदूळ, गहू, कापूस, भाजीपाला, ऊस, इत्यादी पिकांसाठी अॅझोटोबॅक्टर उपयुक्त ठरतो.

अॅझोस्पिरिलम हे जीवाणू मुळांच्या आजूबाजूच्या मातीत (रायझोस्फिअर) वसलेले असतात. ते हवेतील नत्र स्थिरीकरण व पिकांच्या वाढीसाठी संप्रेरके विशेषतः इंडॉल असेटिक आम्ल, जीब्रेलीन्स, सायटोकिनीन्स तयार करतात. त्यामुळे मुळांची वाढ, शाखिकता सुधारते. मका, ऊस, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यासाठी ते उपयुक्त ठरतात. मायकोरायझा हे कवक पिकांच्या मुळांशी संलग्न होऊन जाळे तयार करतात त्यामुळे पिकांची पाणी, खनिजे (विशेषत: स्फुरद, झिंक) आणि जीवनसत्त्वांची शोषणक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते. हे कवक मातीची संरचना सुधारतात, जलधारणा वाढवतात, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. मका, तांदूळ, सोयाबीन, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, गाजर इत्यादींसाठी हे कवक उपयुक्त ठरते.

अॅसीटोबॅक्टर जीवाणू ऊस व बीट पिकांच्या मुळामध्ये शिरकाव करून हवेतील नत्रस्थिरीकरण करतात. नीलहरित शैवाल(अझोला-सायनोबॅक्टेरिया सहजीवन) हवेतून नत्र स्थिरीकरण करतात व ते भातशेतीसाठी उत्तम मानले जातात. स्फुरद आणि पालाश विरघळवणारे जीवाणू (स्यूडोमोनास, बॅसिलस, अ‍ॅसिनेटोबॅक्टर आणि अ‍ॅसिडोथायोबॅसिलस) मातीतील अविद्राव्य स्फुरद आणि पालाश पिकांना सहजरित्या उपलब्ध करून देतात. उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठीदेखील जीवाणूंचा वापर केला जातो.

जगभरातील अभ्यास आणि परिक्षणांवरून जैविक खते योग्य प्रकारे वापरल्यास पिकांची उत्पादकता वाढते, रासायनिक खतवापर कमी होतो आणि पर्यावरणाच्या संवर्धनासदेखील हातभार लागतो.

डॉ. विनायक पांडुरंग सुतार