जैवविज्ञानाच्या प्रगत शाखांमध्ये ‘जिनॉमिक्स’ या विज्ञानशाखेचे स्थान दिवसेंदिवस मोलाचे ठरतआहे. मानवी आरोग्य, आनुवंशिक आजारांची उकल आणि वैयक्तिकृत उपचारपद्धती या क्षेत्रांत जिनॉमिक्समुळे आमूलाग्र बदल घडत आहेत. या रोमांचक आणि गुंतागुंतीच्या विषयाचा मराठीत सखोल वेध घेणारं पुस्तक म्हणजे डॉ. संजय गुप्ते आणि डॉ. अविनाश भोंडवे यांचे ‘जिनॉमिक्स : मानवीजीवनाच्या अंतरंगाचा उलगडा’. रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात विज्ञानाची सखोलता आणि विषयमांडणीची सुलभता यांचा सुरेख मिलाफ साधला आहे.
लेखकद्वयीने अनुवंशशास्त्र आणि जिनॉमिक्स यांतला मूलभूत फरक अतिशय सोप्या शब्दांत स्पष्ट करून पुस्तकाची सुरुवात केली आहे. डीएनएची रचना व कार्य, आनुवंशिकता व उत्परिवर्तन यांसारखी तत्त्वे ते वाचकांना समजावून सांगतात. मानवीजनुकांच्या अभ्यासातून वैद्यकीय निदानशास्त्रात झालेली प्रगती पुस्तकात तपशीलवार मांडली आहे. उपलब्ध महत्त्वाच्या जनुकीय चाचण्यांचे विवेचन ही या पुस्तकाची मोठी जमेची बाजू ठरते. समाजात आढळणाऱ्या आनुवंशिक आजारांची कारणे आणि त्यांची निदानपद्धती लेखकांनी मुद्देसूदपणे उलगडल्या आहेत.
पुस्तकाच्या पुढील प्रकरणांमध्ये लेखकांनी जिनॉमिक्सचे विविध अनुप्रयोग रोचक उदाहरणांसह उलगडले आहेत. विशेषतः कर्करोगासारख्या आजारांमध्ये जनुकांच्या विश्लेषणातून निदान व उपचार कसे क्रांतिकारकरीत्या बदलत आहेत, याचे साक्षात्कार पुस्तक घडवते. वैयक्तिकृत औषधोपचार (पर्सनलाइज्ड मेडिसिन) संकल्पना आता प्रत्यक्षात येत आहे. ‘कर्करोगउपचारातील जिनॉमिक्सक्रांती’ या प्रकरणात नवीन जीनोम-आधारित औषधे आणि निदानातील प्रगतीचे विश्लेषण आहे. ‘डाएट आणि जिनॉमिक्स’ या प्रकरणात आहार व व्यायामाच्या परिणामकारकतेचा आपल्या जनुकीय संरचनेशी असलेल्या अनुबंधाचा उलगडालेखकांनी सुबोधशैलीत मांडला आहे.
जिनॉमिक्सचा वापर फक्त वैद्यकापुरता मर्यादित नसून गुन्हे-अन्वेषण(फॉरेन्सिक) विज्ञान, क्रीडा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांतही वाढत चालल्याचे पुस्तकातून जाणवते. भविष्यातील ‘क्रिस्पर’ सारख्या जनुक-संपादन तंत्रज्ञानाबाबतच्या शक्यता आणि त्यातील नैतिक आव्हाने ही लेखकांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केल्या आहेत.
पुस्तकाची भाषा प्रवाही आणि सर्वसामान्यवाचकांसाठी सुलभ ठेवण्यात आली आहे. दोन्ही लेखकांची वैद्यकीय व वैज्ञानिक पार्श्वभूमी असूनही त्यांनी तांत्रिक शब्दांना योग्य पारिभाषिक शब्द वापरले आहेत. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन विषयाची मांडणी केली आहे. परिणामी लेखन रसरशीत व आकर्षक बनले आहे. मराठी भाषेत विज्ञानाला समर्पित अशा प्रयत्नांची उणीव जाणवत असताना ‘जिनॉमिक्स’ सारखे पुस्तक उपलब्ध होणे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
लेखकद्वयीच्या सखोल अभ्यास, प्रवाही शैली आणि विषयावरील निष्ठेचे हे फलित वाचकांना विचारप्रवृत्त करत उत्साहाने भारावून टाकते.
डॉ. गिरीश महाजन