मानवी आरोग्य हे शाश्वत विकासाचे एक अविभाज्य अंग आहे. आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करून, आपण एक निरोगी आणि समृद्ध जग निर्माण करू शकतो. विविध आजारांपासून शरीरास संरक्षण प्रदान करण्यासाठी तसेच रोगजंतूंच्या संक्रमणाची यंत्रणा समजून घेऊन नैसर्गिक रोगप्रतिकारक प्रणालीतील प्रतिसादाची पद्धत ओळखणे व शरीराच्या संरक्षणप्रणालीविषयी ज्ञान प्राप्त करून घेणे यासाठी नवी दिल्ली येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थेस विशेष महत्त्व आहे.
१९८० च्या दशकात भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागास मानवी शरीरातील प्रतिकारक्षा अधिक महत्वाची असून याबाबतच्या संशोधनासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आधिपत्याखाली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी अर्थात राष्ट्रीय प्रतिरक्षाविज्ञान संस्थेची स्थापना एम.जी.के. मेंनन यांनी केली.१९८२ ते १९९१या काळात सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा.जी.पी. तलवार हे या संस्थेचे संस्थापक संचालक होते. पुरुष आणि महिला प्रजननक्षमतेचे नियमन करण्यासाठी रोगप्रतिकारक दृष्टिकोन विकसित करणे तसेच लशी आणि रोगप्रतिकारक अभिकर्मकांच्या (रीएजंट्स) निर्मितीसाठी उद्योग जगताशी संवाद साधण्याचे कामसुद्धा या संस्थेमार्फत केले जाते.
शरीरातील लिम्फोसाइट्स (लसिकापेशी) या प्रतिक्षमता (प्रतिकारक) प्रथिने बनवतात. अस्थिमज्जेतील (बोनमॅरो) लसिका पेशींना ‘बी’ पेशी तर थायमस ग्रंथीमध्ये विकसित पेशींना ‘टी’ पेशी म्हणतात. या दोन्ही पेशींमध्ये प्रतिक्षमता कशी निर्माण होते व त्याचा संसर्गजंतूंवर कसा परिणाम होतो यावर मुख्य संशोधन होते. जी.पी.तलवार व ए.सुरोलिया यांच्या प्रयत्नाने विकसित झालेले ‘ताल सुर’ नावाचे गर्भनिरोधक, कुष्ठरोग प्रतिबंधक लस तसेच जखमा लवकर बऱ्याकरण्यासाठी भाजलेल्या त्वचेवर लावता येईल, असे बहुवारिक (पॉलीमर) याच संस्थेने विकसित केले. टी आणि बी-लिम्फोसाइटसचे जीवशास्त्र अभ्यासणे, रोगजंतूंना प्रतिसाद देण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणांची कार्यप्रणाली समजून घेणे आणि रोग प्रस्थापित करण्यासाठी रोगजंतूंनी वापरलेल्या क्लृप्त्या शोधून काढणे यावरील संशोधनात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे.
लस बनविण्यासाठीचा जीवाणू जगभरात ‘मायकोबॅक्टेरियम इंडिकस प्रानी’ नावाने ओळखला जातो. कुष्ठरोगाची बाधा न करणारा ‘मायकोबॅक्टेरियम’ भारतात संवर्धित केल्यामुळे ‘इंडिकस’, तसेच जी.पी.तलवार यांचे टोपणनाव ‘प्राण’ व नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनोलॉजीचे संक्षिप्त नाव ‘एनआयआय’ यांचे संयोजित नाव ‘प्रानी’ (प्राण+एनआयआय) असे मिळून ‘मायकोबॅक्टेरियम इंडिकस प्रानी’ हे वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. नव्याने उद्भवणारे संसर्गजन्य आजार व बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या संस्थेला उच्च दर्जाच्या संशोधनाची परंपरा लाभलेली आहे.
डॉ. गजानन माळी